Good News ! राज्यात दीड हजार मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया

Good News ! राज्यात दीड हजार मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कॅन्सर, हृदय, किडनी आदींशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवरील शस्त्रक्रिया आणि उपचार राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) मोफत केले जात आहेत. राज्यात गेल्या वर्षी 3866 मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया पार पडल्या, तर यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांमध्ये 1555 शस्त्रक्रिया करून मुलांना जीवदान मिळाले आहे.मुलांमध्ये हृदय, किडनीशी संबंधित आजारांचे निदान झाल्यास त्यावरील शस्त्रक्रियांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो.

मात्र, आरबीएसके कार्यक्रमामुळे मोठ्या खासगी रुग्णालयांत उपचार करणे शक्य झाले आहे. 0 ते 18 वयोगटातील 66 मुलांवर यावर्षी बहिरेपणावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबवण्यासाठी राज्यभरात विशेष आरोग्य तपासणी पथके कार्यरत आहेत. तपासणीदरम्यान आढळलेले आजार, समस्या समजून घेऊन त्यावरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी पाठपुरावा केला जातो. याअंतर्गत 2019 पासून विविध रुग्णालयांशी सामंजस्य करार झाला आहे.

काय आहे प्रक्रिया ?

पथकांमार्फत गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विनंती अर्ज आणि इतर कागदपत्रे जमा करून घेतली जातात. जिल्हा रुग्णालयाकडून प्रस्ताव आल्यावर जिल्हा परिषदेच्या सीईओंची मान्यता घेतली जाते आणि संबंधित रुग्णालयाला शस्त्रक्रियेबाबत सूचना दिल्या जातात. रुग्णालयाकडून आलेल्या बिलाची रक्कम शासनाकडून अदा केली जाते. पालकांना एकही रुपया भरण्याची गरज भासत नाही. दरवर्षी जास्तीत जास्त मुलांपर्यंत उपचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.

काय आहे बाल स्वास्थ्य कार्यक्रम ?

यामध्ये अंगणवाडी स्तरावरील 0 ते 18 वयोगटातील ग्रामीण व शहरी भागातील बालकांची आरोग्य तपासणी वर्षातून दोन वेळा करण्यात येते. शालेय स्तरावरील मुलांची तपासणी वर्षातून एक वेळा होते. तपासणीदरम्यान आढळून येणार्‍या मुलांमधील जन्मत: व्यंग, जीवनसत्त्वाच्या कमतरतेअभावी होणारे आजार आदींचे निदान केले जाते. ज्यांना मोठे उपचार किंवा शस्त्रक्रियांची गरज आहे, अशा बालकांवर योजनेतून मोफत उपचार करण्यात येतात.

पुणे जिल्हा आघाडीवर

आरबीएसकेअंतर्गत मुलांवर केल्या जाणार्‍या मोफत शस्त्रक्रियांमध्ये पुणे जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यात 2022-23 मध्ये 274 मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर यावर्षी एप्रिल ते सप्टेंबरदम्यान 118 शस्त्रक्रिया पार पडल्या. बहिरेपणावरील शस्त्रक्रियांमध्ये बीड जिल्हा आघाडीवर आहे. इतर शस्त्रक्रियांमध्ये हर्निया, नेत्र शस्त्रक्रिया, किडनी, कॅन्सर आदींचा समावेश होतो.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news