पुणे: मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कोल्हापूर आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती मागणी आणि त्यांना अधिक चांगल्या प्रवासाचा अनुभव देण्यासाठी, पुणे-कोल्हापूर-पुणे टीओडी स्पेशल ((ट्रेन क्रमांक ०१०२३/०१०२४)) च्या कोच रचनेत कायमस्वरूपी सुधारणा करण्यात आली आहे. यामुळे आता या गाडीला अतिरिक्त डबे जोडले जाणार असून, प्रवाशांना आसनक्षमता वाढल्याने प्रवासात अधिक सोय आणि आराम मिळणार आहे.
मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे कोल्हापूर आणि पुणे दरम्यानच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः, वातानुकूलित डब्यांची संख्या वाढल्यामुळे उन्हाळ्यासारख्या हंगामात प्रवाशांना अधिक आरामदायक प्रवास करता येणार आहे. (Latest Pune News)
प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करताना या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वे प्रवाशांना सुधारित क्षमता आणि आराम प्रदान करणे, हाच या कोच रचनेतील वाढ करण्याचा मुख्य उद्देश आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
काय आहे नवीन बदल?
पूर्वीची रचना (१४ एलएचबी डबे) :-सध्याच्या रचनेत १ गार्ड केबिनसह सीटिंग-कम-लगेज रेक, १ जनरेटर-कम-लगेज कोच, ४ जनरल सेकंड क्लास कोच, ७ स्लीपर क्लास कोच आणि १ एसी ३-टियर इकॉनॉमी कोच समाविष्ट आहेत.
सुधारित रचना (१८ एलएचबी डबे) :- या नवीन रचनेत एकूण १८ एलएचबी डबे असतील. यात १ गार्ड केबिनसह सीटिंग-कम-लगेज, १ जनरेटर कार, ४ जनरल सेकंड क्लास कोच, ७ स्लीपर क्लास कोच, ४ एसी ३-टियर कोच (पूर्वी १ एसी ३-टियर इकॉनॉमी होता) आणि १ एसी २-टियर कोच (नवीन भर) समाविष्ट असेल.
कधीपासून लागू होणार हा बदल?
ही सुधारणा दि. ४ जून २०२५ रोजी (बुधवारी) पासून कोल्हापूरहून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक ०१०२४ कोल्हापूर-पुणे टीओडी स्पेशल गाडीला तर आणि दि. ५ जून २०२५ रोजी (गुरुवारी) पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक ०१०२३ पुणे-कोल्हापूर टीओडी स्पेशल गाडीला लागू होईल.