निरा: पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर, पुणे- पंढरपूर पालखी मार्गावरील निरा नदीवर नव्याने बांधलेला पूल सध्या वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या पुलाच्या साइडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल, घाण आणि झाडे-झुडपे वाढली आहेत. विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी निघालेल्या वारकर्यांना या पुलावरून जाताना चिखल आणि घाण तुडवत जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
निरा नदीवरील या पुलाच्या जोडांमधील (जॉइंट्स) रबर तुटले असल्यामुळे वाहने आदळतात आणि त्यांचे नुकसान होते. येत्या काही दिवसांतच पालखी सोहळा सुरू होणार असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. (Latest Pune News)
निरा, पाडेगाव आणि परिसरातील नागरिकांमध्ये याबद्दल तीव्र नाराजी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी सोहळ्यापूर्वी पुलाच्या साईडपट्ट्यांची स्वच्छता करावी, रंगरंगोटी करावी आणि तुटलेले रबर बदलावे अशी मागणी वाहनचालकांसह नागरिक करत आहेत.
निरा नदीवर 1925 मध्ये बांधलेला एक जुना ब्रिटिशकालीन पूल आणि 2005 साली बीओटी तत्त्वावर बांधलेला नवीन पूल असे दोन पूल आहेत. जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून शक्यतो वाहतूक होत नसली तरी, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील माउलींच्या पादुकांना मनिरा स्नानफ घालण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. रथापुढील आणि रथामागील हजारो वारकरी याच पुलावरून सातारा जिल्ह्यातील पाडेगाव (ता. खंडाळा) हद्दीत प्रवेश करतात.
नवीन पुलावरून देखील विठ्ठलाच्या भेटीला निघालेले अनेक वारकरी जात असतात. त्यामुळे या पुलावरील अस्वच्छता आणि इतर समस्यांमुळे त्यांची गैरसोय होणार आहे. पुलाच्या जोडांमधील रबर तुटल्याने वाहनांना धक्के बसतात आणि अपघातांचा धोका वाढतो. महामार्ग प्राधिकरणाने त्वरित यावर लक्ष देऊन समस्या दूर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दिशादर्शक फलकांची गरज
पुणे- पंढरपूर पालखी मार्गावरील निरा नदीवरील नवीन पुलावरून वाहतूक सुरू आहे. निरा (ता. पुरंदर) बाजूकडून पाडेगाव (ता. खंडाळा) बाजूकडे जाताना पूल संपताना अवघड वळण आहे. तसेच पाडेगाव (ता. खंडाळा) बाजूकडून निरा (ता. पुरंदर) बाजूकडे वाहने जाताना पूल संपल्यानंतर उजवीकडे सातारा- नगर राज्यमार्ग आहे आणि समोरून पुणेकडे रस्ता जातो.
मात्र, पाडेगाव (ता. खंडाळा) च्या हद्दीत दिशादर्शक फलक आणि पुढील गावांची नावे असलेले फलक नसल्याने वाहनचालकांना पुढे नगर रस्त्याला कसे जायचे हे कळत नाही. यामुळे पाडेगाव (ता. खंडाळा) च्या हद्दीत जयदुर्गा मंगल कार्यालयासमोर तसेच निरा (ता. पुरंदर) हद्दीत पालखीतळाजवळ दिशादर्शक फलक बसवणे आवश्यक आहे.