

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वन विभागाच्या जंगलांमध्ये ग्लिरिशिडीयाची झाडे सध्या फुलांनी बहरली आहेत. ही ग्लिरिशिडीयाची गुलाबी, पांढरी फिक्कट रंगांची फुले लक्ष वेधून घेत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात खडकी, थोरांदळे, रांजणी, वळती, नागापूर, भागडी, शिंगवे या गावांना मोठे वनक्षेत्र लाभले आहे.
या वनामध्ये सध्या ग्लिरिशिडीयाची झाडे गुलाबी, पांढर्या फिक्कट रंगांच्या फुलांनी बहरली आहेत. या झाडांना दरवर्षी जानेवारी महिन्यात पानगळती होऊन गुलाबी, पांढर्या रंगांची फिक्कट फुले येतात. सध्या ही झाडे लक्ष वेधून घेत आहेत. या ग्लिरिशिडीयाच्या बिया उंदरांनी खाल्ल्यास उंदीर मरतात. त्यामुळे या झाडांना ग्रामीण भागात उंदीरमारी असे देखील म्हणतात. या झाडांची फुले घरात आणून ठेवल्यास त्यांच्या वासाने देखील उंदीर पळून जातात.