पीएच.डी संशोधकांना सरसकट स्कॉलरशिप द्या : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 Nitin Gadkari
Nitin Gadkari

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात संशोधक विद्यार्थ्यांवर इतर राज्यांच्या तुलनेत अत्यंत कमी निधी खर्च केला जातो. पी.एचडी. करणा-या प्रत्येक संशोधकाला समाजातील, देशातील प्रमुख अडचणी, दुखणी, कमतरता यावर शास्त्रशुध्द संशोधन करणे, डेटा संकलन करुन संशोधनाची मांडणी करावी लागते. दोन रिसर्च आर्टिकल्स, रिसर्च पेपर लिहिणे, यांकरिता पी.एचडी. करणाऱ्यांना मेहनत घ्यावी लागते. परंतु बार्टी, सारथी आणि महाज्योती सारख्या माध्यमांतून पीएचडी करणा-या संशोधक विद्यार्थ्यांना अपेक्षित मदत मिळत नाही त्यामुळे त्यांना सरसकट स्कॉलरशिप द्यावी असे पत्र केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

गडकरी यांनी पाटील यांना दिलेल्या निवेदनानुसार, संशोधक विद्यार्थ्यांना राज्य सरकारव्दारे सरसकट स्कॉलरशिप देणे गरजेचे आहे. परंतू पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पीएचडी करणारे संशोधक विद्यार्थी हे गॅज्युएट झाल्यानंतर आणि दोन वर्षे मास्टर झाल्यावर पीएचडी करण्याकरीता किमान 55 टक्के गुण असण्याची अट आहे व या अटीची पूर्तता झाल्यावर देखील अॅडमिशन मिळणे सोपे नाही.

त्याकरीता अनेक परिक्षा देणे गरजेचे आहे. तसेच पीएचडी करीता गाईड मिळणे देखील एक कठीण काम आहे. त्यामुळे बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून पीएचडी करणा-या संशोधक विद्यार्थ्यांना राज्य सरकारने अटी शिथील करुन स्कॉलरशिप देण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे राज्यात पीएचडी धारकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. तरी याबाबत आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा आणि पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा असे गडकरी यांनी नमूद केले आहे. आता खुद्द गडकरी यांनीच या प्रश्नात लक्ष घातल्यामुळे आता तरी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट स्कॉलरशिप मिळणार का याकडे संशोधक विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news