मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्राला वरदान ठरणार्या शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातून त्याखालील घोड नदीवरील 5 कोल्हापूर बंधार्यांत बुधवारपासून (दि. 6) 1840 क्यूसेक प्रतिसेंकद वेगाने पाणी सोडण्यात आले. यामधून 30 ते 35 टक्के बंधारे पाण्याने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती घोड धरणाचे उपअभियंता एम. पी. ठणगे यांनी दिली. घोड धरणातील पाण्याचा लाभ शिरसगाव काटा, धनगरवाडी, नलगेमळा, इनामगाव (गांधलेमळा), तांदळी (खोरेवस्ती) आदी बंधार्यांवर अवलंबून असणार्या लाभक्षेत्राला होतो, यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्याचबरोबर जनावरांना व नागरिकांनाही यामधील पाण्याचा पिण्यासाठी फायदा होतो. चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे सुरुवातीला घोड जलाशयात पाणीच नव्हते.
त्यानंतर कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणातून अतिरिक्त पाणी आल्यानंतर घोड धरण 100 टक्के भरले. त्या आशेवरती लाभधारक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस त्याचबरोबर इतर पिके घेतली. मात्र, मागील काही दिवसांपासून पाचही बंधार्यांतील पाणी संपुष्टात आल्यामुळे पाणीटंचाई निर्माण होऊन पिके सुकू लागली होती. तरी, धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्यांमधून होत होती. त्यानुसार बुधवारी धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले. ऐन टंचाईच्या काळात पाणी सुटल्यामुळे लाभधारक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. माजी सरपंच पल्लवी घाटगे म्हणाल्या, चालू वर्षी पाण्याचा तुटवडा सुरुवातीपासून जाणवत होता, परंतु आता धरण क्षेत्रातून घोड नदीला पाणी सोडले आहे. परंतु, बंधार्यांतून या पाण्याची गळती होऊ नये यासाठी संबंधित विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे.
घोड नदीमध्ये धरण क्षेत्रामधून पाणी सोडावे यासाठी दै. 'पुढारी'ने सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत व शेतकर्यांची मागणी लक्षात घेत आमदार अॅड अशोक पवार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. पाणी सोडतेवेळी माजी मंत्री पाचपुते, आमदार पवार, कुकडीचे कार्यकारी अभियंता बी. एस. वाळके, घोडगंगा कारखान्याचे संचालक संभाजी फराटे, नरेंद्र माने, दत्तात्रय फराटे, शंकर फराटे, अनिल पवार, संजय घाटगे, खंडेराव फराटे, विनायक घाडगे, विष्णुपंत वाबळे, नानासाहेब घाडगे, अनिल फलके, भास्कर थोरात, हनुमंत तांबे, ऋषीकेश फराटे, गणेश फराटे, शरद चकोर, दत्तात्रय नलगे, काकासाहेब मोहिते आदी उपस्थित होते.
हेही वाचा