भीमाशंकर यात्रेसाठी प्रशासन सज्ज ! | पुढारी

भीमाशंकर यात्रेसाठी प्रशासन सज्ज !

भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. यंदाही महाशिवरात्र यात्रेसाठी सज्ज झाले आहे. देवस्थान व प्रशासनाच्या वतीने दर्शनबारी, मुख दर्शनबारी, मंदिराची सजावट, मंदिराबाहेर मांडव आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. बाकी तयारीही सुरू असल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश कौदरे यांनी सांगितले. महाशिवरात्रीच्या अनुषंगाने 3 दिवस होणाऱ्या यात्रेवर पोलिस लक्ष ठेवणार आहे. यासाठी भीमाशंकर पार्किंग परिसरामध्ये प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहनचालकांची तपासणी ब्रीथ अ‍ॅनलायझर मशिनव्दारे केली जाणार आहे. यामध्ये दारू पिणारी व्यक्ती, गाडीत दारूच्या बाटल्या व धांगडधिंगा घालताना कोणी आढळल्यास त्यावर कडक कारवाई करणार आहे. भाविकांनी आपल्याजवळील मौल्यवान वस्तू व लहान मुले यांची काळजी घ्यावी, असे आवाहन घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी केले आहे.

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दि. 8 ते 10 मार्चदरम्यान होणारी महाशिवरात्री यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्या यात्रेनिमित्त महसूल, विद्युत विभाग, आरोग्य विभाग, पोलिस विभाग, भीमाशंकर देवस्थान आदी विभागांकडून जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. यात्रेमध्ये भाविकांची सुरक्षितता व जास्तीत जास्त भाविकांना पवित्र शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेता यावा, यासाठी घोडेगाव, खेड या दोन पोलिस ठाण्यांनी आपला वेगवेगळा बंदोबस्त नेमला आहे. बॉम्बशोधक पथक, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनबारीत यात्रेकरूंची तपासणी, मंदिराजवळ व पायऱ्यांच्या सुरुवातीला वॉच टॉवर, डॉग स्क्वॉड, हँड मेटल डिटेक्टर अशी विविध अत्याधुनिक यंत्रणा व मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

घोडेगाव पोलिस ठाण्याने भीमाशंकर मंदिराकडे जाताना वाहनतळ क्रमांक 4 व 5 येथे मोठ्या बसचे वाहनतळ केले आहे. दोन व तीन वाहनतळांना लहान गाड्या आणि एक नंबर वाहनतळाला दुचाकी गाड्यांचे वाहनतळ केले आहे. यासाठी अधिकारी, पोलिस कर्मचारी, वाहतूक अंमलदार असे एकंदरीत 200 पोलिस कर्मचारी आहेत. तसेच ब्रीथ अ‍ॅनलायझर मशिनव्दारे मद्यप्राशन तपासणीसाठी वेगळे पथक तैनात करण्यात येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी सांगितले.

भीमाशंकर येथे गेटजवळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती कक्ष उभारले जाणार आहे. यात नवीन मतदार, पॅम्पलेट, माहितीपुस्तक, बॅनर, ईव्हीएम मशिन, प्रात्यक्षिक आदी या कक्षात केले जाणार आहे.

संजय नागटिळक, तहसीलदार, आंबेगाव

भीमाशंकर विकास आराखड्याच्या माध्यमातून पायरी मार्गाचे काम चालू असल्याने भाविकांना सिमेंट रस्त्याचा वापर करावा लागत होता. आता यात्राकाळात पायरी मार्ग चालू करण्यात येणार आहे. तसेच पायरी मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. यात्रा स्वच्छ व प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांनी प्लास्टिक घेऊन येऊ नये, कोठेही कचरा-घाण टाकू नये. असे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. भाविकांसाठी मुखदर्शन, दर्शन पास यांची सुविधा करण्यात आली आहे. भाविकांनी यात्राकाळात सर्वांना दर्शन सुलभ व्हावे, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर, दत्तात्रय कौदरे, गोरक्षनाथ कौदरे, चंद्रकांत कौदरे यांनी केले.

हेही वाचा

Back to top button