

निमोणे: घोड धरणासाठी चिंचणी (ता. शिरूर) गावातील तेराशे एकर शेतजमीन संपादित करण्यात आली होती. त्यातील 800 एकर प्रत्यक्षात घोड प्रकल्पात गेली. उरलेल्या पाचशे एकरावर मूळ जमीन मालकाचे वारसदार मागील 70-80 वर्षांपासून शेती करीत आहेत. त्याच क्षेत्रात त्यांची घरेदारी आहेत. मात्र पाटबंधारे विभागाने पंधरा दिवसात तुमचे अतिक्रमण काढा; अन्यथा बुलडोझर लावू अशा नोटिसा तब्बल 78 जणांना दिल्या आहेत. त्यामुळे चिंचणीकरांना अक्षरशः थंडीत घाम फुटला आहे.
याबाबत चिंचणीचे माजी सरपंच शामराव पवार यांनी सांगितले की, सरकारने आमची तेराशे एकर शेतजमीन संपादित केली. प्रत्यक्ष धरणासाठी 800 एकर जमीन गेली. मागील 80 वर्षांपासून 500 एकर शेतजमीन आमच्या ताब्यात आहे. त्यावर आमची उपजीविका सुरू आहे.
सरकारदप्तरी चिंचणी गावचे गावठाण संपादित केल्याचे निवाडा पत्र उपलब्ध आहे. याचा अर्थ ज्याचं घर गेलं त्याला सरकारने काय मोबदला दिला हे लिखित आहे. मात्र, त्या शेतजमिनी संपादित केल्या त्याचा निवाडा पत्र सरकारकडे नाही. आमच्या जमिनी ताब्यात घेताना सरकारने कोणताही मोबदला दिला नाही.
संपादित केलेले अतिरिक्त 500 एकर क्षेत्र मूळ मालकांना वेळीच परत करा, अशा पद्धतीचा आदेश 1980 मध्ये जिल्हाधिका-यांनी दिला होता. परंतु, त्यात काही प्रशासकीय बाबूंनी हेराफेरी करून आमच्या आयुष्याचं मातेरे केले, असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, घोड धरणाच्या संपादित क्षेत्रातील अतिक्रमण काढण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
सगळ्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. काळी कसदार शेतजमीन, राहत्या घरांवर बुलडोझर फिरवून याच संपादित क्षेत्रात मुख्यमंत्री कृषी वाहिनी सौर प्रकल्प ऊर्जा उभा करण्याचा घाट असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली. याबाबत घोड शाखा अभियंता वैभव काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.