

भवानीनगर: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये शुक्रवार (दि. 16) पासून गाळपास येणाऱ्या सर्वच उसाला प्रतिटन 100 रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी दिली.
श्री छत्रपती कारखान्याने चालू गळीत हंगामात दि. 1 जानेवारीपासून गळीतास येणार्या सुरू व पूर्वहंगामी उसास प्रतिटन रुपये 75 प्रमाणे व खोडव्यास प्रतिटन रुपये 100 प्रमाणे अनुदान देण्याचे यापूर्वी जाहीर केले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आडसाली ऊस जास्त असल्याने सभासदांच्या ऊसतोडीस होणारा विलंब व त्यामुळे सभासदांचे होणारे आर्थिक नुकसान विचारात घेऊन शुक्रवारपासून कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील गाळपास येणाऱ्या उसास सरसकट प्रतिटन 100 रुपये अनुदान देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाचे बैठकीत घेण्यात आला आहे.
त्यामुळे शुक्रवारपासून गळीतास येणाऱ्या आडसाली, सुरू, पूर्वहंगामी व खोडवा उसाला प्रतिटन 3 हजार 201 रुपये भाव मिळणार आहेत व गुरुवारपर्यंत गळीत होणाऱ्या आडसाली उसास प्रतिटन 3 हजार 101 रुपये, सुरू व पूर्व हंगामी उसास प्रतिटन 3 हजार 176 रुपये आणि खोडव्यास प्रतिटन 3 हजार 201 रुपये मिळणार आहेत. चालू गळीत हंगामात जळीत ऊस जास्त प्रमाणात गाळपास येत असून त्याचा साखर उताऱ्यावर परिणाम होत असल्याने 16 जानेवारीपासून गळीतास येणाऱ्या जळीत उसास प्रतिटन 200 रुपये प्रमाणे ऊस जळीत नुकसानभरपाई कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑफ सीझनमध्ये कारखान्यातील ओव्हरहॉलिंगची व दुरुस्तीची कामे चांगली केल्यामुळे कारखान्यात सातत्याने 8 हजार टनापेक्षा अधिक उसाचे दैनंदिन गाळप होत आहे. त्यामुळे गतवर्षीच्या हंगामाच्या तुलनेत 2 लाख 11 हजार टनापेक्षा अधिक उसाचे गाळप झाले आहे व साखर उताऱ्यात 0.80 टक्क्याने वाढ झाली आहे. कारखान्याच्या मागील तीन गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील चांगल्या प्रतीचा ऊस बाहेर गेल्याने गाळप कमी झाले व साखर उताऱ्यावर परिणाम झाला. त्यामुळे उत्पन्न कमी होऊन कारखान्यासमोरील आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. यापुढे कारखान्याच्या ऊसगाळप व साखर उताऱ्यात वाढ झाली तरच कारखाना आर्थिक गर्तेतून बाहेर पडेल. सभासदांनी ‘माझा कारखाना माझी जबाबदारी’ ही जाणीव ठेवून आपला चांगल्या प्रतीचा ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी केले आहे.
कारखान्याचे संचालक ॲड शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, शिवाजीराव निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव व जनरल मॅनेजर हनुमंत करवर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
साखर उताऱ्यात कारखाना जिल्ह्यात दुसरा
कारखान्याने 73 दिवसांत 5 लाख 59 हजार 14 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे व 6 लाख 8 हजार 600 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा 11.03 टक्के इतका आहे. हा साखर उतारा पुणे जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पातून 1 कोटी 79 लाख 05 हजार युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात केली आहे.