

पुणे: एकीकडे राजकीय पक्षातील अटीतटीची लढत, तर दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या कुटुंबीयात दिलेली उमेदवारी यामुळे पुणे महापालिकेची निवडणूक चर्चेची ठरत असतानाच मतदानप्रक्रिया मात्र शांततेत पार पडल्याने प्रशासकीय यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काही ठिकाणच्या किरकोळ वादावादीच्या घटना वगळता कोठेही गालबोट लागले नाही. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बुधवारी (दि.14) रात्रीपासूनच बंदोबस्ताची चोख आखणी करण्यात आली होती, तर संवेदनशील इमारतीतील मतदान केंद्रावर विशेष बंदोबस्त तैनात केला होता. गुन्हेगारीचा धाक असलेल्या परिसरात खबरदारी घेण्यात आली होती. शिघकृती दल, एसआरपीएफ, होमगार्ड, गुन्हे शाखेची पथके असा तब्बल 12 हजार पोलिसांचा फौजफाटा पोलिसांकडून तैनात करण्यात आला होता.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, राजेश बनसोडे, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्ताची आखणी केली होती. मतदान सुरू असताना शहरातील सर्व घडमोडींचा आढावा वरिष्ठ पोलिस अधिकारी घेत होते. अनुचित घटना किंवा प्रकार घडल्यास त्वरित तेथे पोलिस पोहोचतील, अशा पद्धतीने बंदोबस्ताची आखणी करण्यात आली होती, तर शिवाजीनगर येथील मुख्यालयात राखीव मनुष्यबळ ठेवण्यात आले होते. मतदान प्रक्रियेत अडथळा तसेच गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला होता.
शहरासह उपनगरांतील 90 संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. अनुचित घटना रोखण्यासाठी शीघ कृती दल (क्विक रिस्पॉन्स टीम), तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर विशेष पथक (स्ट्रायकिंग फोर्स) गस्त घालत होते. मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर मतदार वगळता कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. पोलिसांकडून मतदान केंद्राच्या आत, बाहेर आणि शंभर मीटर परिसर असा त्रिस्तरीय बंदोबस्त तैनात केला होता.
गुरुवारी (दि.15) पुणे शहर, उपनगरांत 3983 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडली. प्रत्येक केंद्रावर एक पोलिस कर्मचारी तैनात होता. शहरातील 913 इमारतीत हे मतदान झाले. अशा प्रत्येक इमारतीवर दोन पोलिस कर्मचारी तैनात केले होते, तर प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस निरीक्षकांची गस्त होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तासह गुन्हे शाखेचे पथके देखील साध्या वेशात गस्तीवर होती. शहरात 14 पोलिस उपायुक्त, 30 सहायक पोलिस आयुक्त, 166 पोलिस निरीक्षक, 723 सहायक पोलिस निरीक्षक तसेच साडेबारा हजार पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात होता. तसेच गृहरक्षक दलाचे 3250 जवान, राज्य राखीव पोलिस दलाच्या चार तुकड्या तैनात केल्या होत्या.
गुन्हेगारांच्या आवळल्या होत्या मुसक्या
महापालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी अटीतटीची होती. काही लढती तर मंत्री, पुढाऱ्यांसाठी प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या. गुन्हेगारी पार्श्र्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीपासूनच खबरदारी घेत गुन्हेगारांचा या निवडणूक प्रक्रियेवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव राहणार नाही याची विशेष काळजी घेतली होती. पोलिसांनी अगोदरच 3 हजार 439 प्रतिबंधात्मक कारवाया केल्या होत्या.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिकारी, कर्मचारी, शीघ कृती दले, एसआरपीएफ असा 12 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. तसेच मोठ्या प्रमाणात सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली होती. त्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. किरकोळ वादावादीच्या घटना वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही
रंजनकुमार शर्मा सह पोलिस आयुक्त पुणे शहर