

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर आजारांवरील औषधांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. सर्वसामान्यांना परवडणार्या दरात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी राज्य शासनातर्फे शहरात जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या 19 दवाखान्यांमध्ये औषध दुकानांसाठी जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
जेनेरिक औषधांच्या दुकानांसाठी औषधांचा पुरवठा राज्य शासनाकडून केला जाणार आहे. दुकानासाठी जागा महापालिकेकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी एका महिन्याला सरासरी 40 हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे.
शहरी गरीब योजनेसह सर्वसामान्यांनाही येथून औषधे खरेदी करता येतील, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली. जेनेरिक औषधांची दुकाने पुढील दोन महिन्यांमध्ये सुरू होतील, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. सर्दी, ताप, खोकला अशा किरकोळ आजारांपासून कॅन्सर, हृदयविकार अशा आजारांवरील औषधेही तेथे उपलब्ध असणार आहेत. जेनेरिक औषधांच्या दुकानासाठी राज्य शासनाने नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्योर्मेंट प्रोसेसिंग अँड रिटेलिंग को-ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया लिमिटेड (नॅकॉफ) या संस्थेची निवड केली.
हेही वाचा