‘त्या’ होर्डिंगला राजकीय दबावामुळे मान्यता; महापालिकेने नाकारली होती परवानगी

‘त्या’ होर्डिंगला राजकीय दबावामुळे मान्यता; महापालिकेने नाकारली होती परवानगी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या नवीन इमारतीच्या दारात एका रात्रीत उभारलेले आणि सकाळी काढलेल्या नियमबाह्य होर्डिंगची मान्यता प्रशासनाने सुरुवातील नाकारली होती. मात्र, राजकीय नेत्यांच्या दबावामुळे प्रशासनाने पुन्हा या होर्डिंगला परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील अधिकृत मात्र धोकादायक व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. असे असताना महापालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ नवीन होर्डिंग उभारण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी होर्डिंगसाठी एक मोठा गर्डर उभारण्यात आला होता. यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर महापालिकेने येथील होर्डिंगला दोन महिन्यांपूर्वी परवानगी दिल्याचे समोर आले.

एकीकडे रहदारीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या अधिकृत व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू असताना महापालिकेने पीएमपीएमएल बसस्थानकाच्या आणि महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ कशी परवानगी दिली, असा प्रश्न उपस्थित करत दैनिक पुढारीने शुक्रवारी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने गुरुवारी एका रात्रीत होर्डिंगचा संपूर्ण सांगाडा उभा केला. महापालिकेच्या या कारभारावर टीकेची झोड उठताच महापालिकेने शुक्रवारी हे होर्डिंग हटविले. यासंदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे. नागरिकांची रहदार असलेल्या ठिकाणी होर्डिंगला परवानगी देता येत नाही, असे कारण देत महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने या होर्डिंगची परवानगी नाकारली होती. मात्र, राजकीय दबाव आल्यानंतर प्रशासनाने पुन्हा परवानगी दिली. विशेष म्हणजे ही परवानगी पीएमपीएमएल बस स्टाँडच्या इमारतीवर देण्यात आली होती. मात्र, संबंधित ठेकेदाराने ते मोकळ्या जागेत उभारले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news