

पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणातील फरार गुंड नीलेश घायवळने पासपोर्टवरील नावात बदल करून लंडनला पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घायवळविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याने देशाबाहेर पलायन केले कसे आणि त्यामागे कोणाचा राजकीय हात आहे? या प्रश्नांवरून पुण्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Latest Pune News)
‘पाटील यांच्या कार्यालयातूनच गुन्हेगारांशी संपर्क साधला गेला,’ असा सनसनाटी आरोप धंगेकर यांनी केला. माध्यमांशी बोलताना धंगेकर म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात ‘पाटील’ नावाचा एक व्यक्ती काम पाहतो. त्याचे सर्व मोबाईल आणि कॉल डिटेल रेकॉर्ड पोलिसांनी तपासावे.
घायवळ आणि त्याच्यात किती वेळा संवाद झाला, तसेच चंद्रकांत पाटील यांना किती वेळा निरोप दिला, याची माहिती मिळेल. पण सत्ता असताना पोलिसांकडून काहीही होत नाही, हीच वस्तुस्थिती आहे. घायवळ एकट्याने असे काही करू शकत नाही. पोलिसांनी ठरवले, तर तो नेस्तनाबूत होईल, पण त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे, ज्यांनी ही पिलावळ वाढवली आहे, त्यांच्याच तपासाची गरज आहे.
राजकीय संरक्षणाशिवाय कोणी देशाबाहेर पळ काढू शकत नाही, हे सत्य जनतेसमोर यायलाच हवे. घायवळविरुद्ध पूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात खंडणी, धमकी, आणि मारहाणीचे गुन्हे नोंदले आहेत. अलीकडेच कोथरूड भागात झालेल्या गोळीबारप्रकरणी तो फरार झाला होता.