

पुणे : सामिष खवय्यांनी हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारून बुधवारी ’गटारी’ साजरी केली. मटण, चिकन, मासळीच्या खरेदीसाठी सकाळपासून बाजारात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
आषाढ महिन्याची सांगता गुरुवारी, तर श्रावण महिन्याचा प्रारंभ शुक्रवारी होणार आहे. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस दीपअमावस्या म्हणून साजरा केला जातो. श्रावण महिन्यात सामिष पदार्थ वर्ज्य केले जातात. श्रावण महिन्यानंतर गणेशोत्सवाचा प्रारंभ होतो. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवातही सामिष पदार्थ वर्ज्य केले जातात. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी येणार्या अमावस्येला खवय्यांच्या भाषेत ’गटारी’ असे संबोधले जाते. गटारी अमावस्येला घरोघरी सामिष पदार्थ तयार केले जातात. अनेक जण मित्रपरिवार, नातेवाइकांसोबत बेत आखतात. यंदा आषाढ महिन्याची सांगता गुरुवारी होणार आहे. गुरुवारी शक्यतो सामिष पदार्थांचे सेवन वर्ज्य मानले जाते. त्यामुळे खवय्यांनी बुधवारी चिकन, मटण, मासळीवर ताव मारून गटारी साजरी केली.
खवय्यांची सकाळपासून मटण, मासळी, चिकनखरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. गणेश पेठेतील मासळी बाजार, कसबा पेठेतील मटण, मासळी बाजार, विश्रांतवाडीतील मासळी बाजार, तसेच लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटसह शहर, तसेच उपनगरातील बाजारात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी 20 ते 25 टन, नदीतील मासळी एक ते दोन टन, आंध— प्रदेशातून रहू, कतला, सीलनची 20 ते 25 टन अशी आवक झाली. सकाळपासून मासळीखरेदीसाठी गर्दी झाली होती. पापलेट, सुरमई, वाम, रावस, कोळंबी, ओले बोंबील या मासळीला चांगली मागणी राहिली, अशी माहिती गणेश पेठ मासळी बाजारातील प्रमुख व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात अडीच ते तीन हजार शेळी, मेढींची खरेदी-विक्री झाली. पुणे, तसेच शेजारील जिल्ह्यातील बाजारातून मटणविक्रेत्यांनी शेळी-मेंढीची खरेदी केली, असे पुणे हिंदू खाटीक मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी नमूद केले.
चिकनला चांगली मागणी राहिली. पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरात बुधवारी 600 ते 700 टन चिकनची विक्री झाली. अंड्यांच्या दरात शेकड्यामागे 30 रुपयांनी घट झाली. चिकनचे दर स्थिर असल्याचे पुणे बॉयलर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी यांनी सांगितले.
मटण - 780 रुपये
चिकन - 200 रुपये
पापलेट - 1200 ते 1800 रुपये
सुरमई - 1000 ते 1400 रुपये
वाम - 1000 रुपये
रावस - 1000 रुपये
कोळंबी - 400 ते 700 रुपये