पुणे : पुण्यातील बहुचर्चित सिंहगड पुलाची एक बाजू वाहतुकीस सुरू करण्यात आली असून, या पुलाची दुसरी बाजू सुरू व्हायला ऑगस्ट महिना अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
पुण्यातील बहुप्रतीक्षित आणि सर्वात लांब अशी ओळख असणार्या सिंहगड पुलाची एक बाजू ही 1 मे रोजी खुली करण्यात आली. या पुलाचे उद्घाटन झाल्यावर दुसरी बाजू दोन महिन्यांत सुरू करण्याचे महानगरपालिकेचे नियोजन होते. मात्र, पावसामुळे दुसरी बाजू पूर्ण करण्याचे नियोजन फिस्कटले. या पुलाची दुसरी बाजू सुरू व्हायला आणखी कालावधी लागणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या नागरिकांची सध्या तरी वाहतूक कोंडीतून सुटका होण्याचे चिन्ह नाही.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ती सोडवण्यासाठी या मार्गावर पूल तयार करण्यास मंजुरी देण्यात आली होती. महापालिकेच्या भवन विभागाने 2021 मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात केली. अडीच किलोमीटर लांबीचा हा पूल असून, हा उड्डाणपूल मार्चअखेर तर माणिकबाग ते विठ्ठलवाडीदरम्यान उड्डाणपूल डिसेंबरअखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. विठ्ठलवाडी ते फन टाइम चित्रपटगृहादरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे हा पूल कधी सुरू होणार, असा सवाल पुणेकरांनी उपस्थित केला होता. या पुलाचे काम नियोजित वेळेच्या सहा महिन्यांआधी पूर्ण झाल्याने 1 मे रोजी पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. पूलाची दुसरी बाजू जुलै महिन्यात सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन होते. त्या दृष्टीने तयारीदेखील सुरू करण्यात आली होती.
एक बाजू पूर्ण झाल्याने तेथील कामगार व अभियंत्रे पुलाची दुसरी बाजू पूर्ण करण्याच्या कामी लागली. मात्र, पावसामुळे पुलाचे काम लांबले. येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या पुलाची दुसरी बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन आहे. हा पूल जवळपास पूर्ण झाला आहे. दुसर्या बाजूच्या पुलावर काही ठिकाणी डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुलावर मुरूम टाकून रस्ता तयार केला असून, पावसामुळे या कामात अडथळे येत होते.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या मार्गावर उड्डाणपूल तयार करण्यात आला. तीन वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुलाची दुसरी बाजू खुली न झाल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ आहे.
पावसामुळे या पुलाच्या कामात अडथळे आले होते. त्यामुळे या पुलाची दुसरी बाजू सुरू करण्यास विलंब लागला. पुलाच्या दुसर्या बाजूचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ऑगस्टअखेरपर्यर्ंत पुलाची दुसरी बाजू सुरू करण्याचे आमचे नियोजन आहे.
- पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका.