निनाद देशमुख
पुणे: ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’चा पुणे महापालिकेमार्फत ढोल बडवला जातो. मात्र, पुणे शहरासह उपनगरांत पालिकेच्या घंटागाड्यांमार्फत कचरा उचलला जात नसल्याने रस्त्याच्या कडेला कचर्याचे ढीग साचायला लागले आहेत.
पुण्यात नव्याने दाखल झालेल्या गावांमध्ये तर कचर्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सूस, महाळुंगे, बाणेर, पाषाण, वडगाव, धायरी आदी परिसरात कचर्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कचरानिर्मूलनावर करण्यात येणारा पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा कचरा जातो कुठे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. (latest pune news)
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत व पुणे महापालिकेमार्फत शहरातील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. तर, सोसायट्यांमधील कचरा गोळा करण्यासाठी पालिकेच्या व स्वच्छ संस्थेच्या गाड्या फिरत असतात.
मात्र, पुण्यात काही मोजक्याच ठिकाणी या गाड्या फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या कचरागाड्या दोन ते चार दिवस येत नसल्याने सोसायट्यातील कचरा हा पडून राहत आहे.
भरलेल्या कचराकुंड्या रिकाम्या केल्या जात नसल्याने रस्त्यावर हा कचरा फेकून दिला जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. उपनगरात कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. यामुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. याचा त्रास येणार्या-जाणार्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.
दोन-तीन दिवसांनंतर येतात घंटागाड्या
पालिकेच्या स्वच्छ एजन्सीमार्फत अनेक घंटागाड्या शहरात फिरत असतात. सोसायट्यांतील कचरा उचलण्यासाठी एका फ्लॅटमागे 80 रुपये घेतले जातात. पाषाण, बाणेर, सूस परिसरात 70 ते 80 फ्लॅट असलेल्या सोसायट्यांकडून महिन्याला कचरा उचलण्यासाठी तब्बल 6 ते 7 हजार रुपये घेतले जातात.
हा कचरा रोज उचलून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असते. मात्र, या घंटागाड्या दोन ते तीन दिवसांनी येत असल्याने कचरा तसाच पडून राहत आहे. यामुळे दुर्गंधी सुटून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरात रोज 200 टन कचर्याचे विलगीकरण
पुण्यात पुणे महापालिकेची 979 विविध प्रकारचा कचरा गोळा करणारी वाहने व कर्मचारी आहेत. तर, स्वच्छ संस्थेचे 4 हजार कचरावेचक पुण्यात कचरा गोळा करण्याचे काम करतात. कचरावेचकांकडे अंदाजे 3 हजार ढकलगाड्या, तर 124 छोटे टेम्पो आहेत.
या माध्यमातून सोसायट्यांमध्ये जाऊन कचरा गोळा केला जातो. पुण्यातील सुमारे 10 लाख घरांमधून हा कचरा गोळा केला जातो. शहरात रोज 200 टन कचर्याचे विलगीकरण केले जात असून, यातून पालिकेचे दरवर्षी 20 कोटी रुपये वाचत आहेत.
पुणे महापालिका आमच्याकडून मोठ्या प्रमाणात टॅक्स वसूल करीत असते. त्यामुळे कचरा उचलण्याची व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पालिकेची आहे. हा कचरा मोफत उचलणे अपेक्षित आहे. पण, यासाठी पैसे मोजावे लागतात, हे चुकीचे आहे. याचा पालिकेने विचार करायला हवा.
अरुण बुधले, सचिव, किरण समृद्धी हौसिंग सोसायटी
बाणेर, पाषाण, सूस, परिसरातील कचरा विलगीकरण केंद्र बाणेर येथे आहे. या कचरा विलगीकरण केंद्राला आग लागल्यामुळे काही दिवस कचरा गोळा करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आला होता. मात्र, आता कचरा वेचण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. तरीसुद्धा जर कचरा उचलला जात नसेल तर 9765999500 या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करावी.
हर्षद बरडे, संचालक, स्वच्छ संस्था