

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : रात्रीच्या वेळी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन कोयते, मिरची पावडर, मोबाईल, टेम्पो आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 17) पहाटे तीनच्या सुमारास थेरगाव येथील डीमार्ट जवळ ही कारवाई करण्यात आली. शाम हरी गाढवे (21, रा. निगडी), अतिश भारत सिरसाट (19, रा. चिंचवड), नवनाथ दिगंबर साठे (35, रा. थेरगाव. मूळ रा. खुडूस, ता. माळशिरस, जि. सोलापूर), शुभम सिद्राम कांबळे (19, रा. पिंपरी. मूळ रा. कामटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
तसेच, आरोपी करणसिंग ऊर्फ कल्ल्या चरणसिंग टाक (19, रा. पिंपरी) हा पळून गेला आहे. पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस गुरुवारी मध्यरात्री वाकड, थेरगाव परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी पोलिसांना माहिती मिळाली की, थेरगाव येथील डीमार्ट जवळ काहीजण संशयितरीत्या थांबले असून, त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहेत. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला. पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच सर्वजण पळून जाऊ लागले. त्या वेळी पोलिसांनी शिताफीने चौघांना अटक केली. त्यांचा पाचवा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपींकडून पोलिसांनी तीन कोयते, मिरची पावडर, मोबाईल फोन, तीनचाकी टेम्पो, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडे चौकशी केली असता ते वाकड परिसरात बंद असलेली दुकाने, मॉल, डी मार्ट तसेच चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांना कोयत्याचा धाक दाखवून दरोडा घालणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 20 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. आरोपी अतिश शिरसाठ याच्यावर वाकड, पिंपरी, चिंचवड पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. शाम गाढवे याच्यावर तळेगाव दाभाडे, सांगवी, चिंचवड पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. करणसिंग टाक याच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शंतनू नाईक निंबाळकर, सहायक फौजदार राजेंद्र काळे, पोलिस अंमलदार वंदू गिरे, अतिक शेख, रमेश खेडकर,
गिलबिले, लोखंडे यांनी केली.
हेही वाचा