पुणे: अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती, नेपाळच्या काठमांडूमधील श्रीकृष्ण मंदिर अन् केदारनाथ मंदिर... गणेशोत्सवात अशा विविध मंदिरांच्या प्रतिकृती सादर करून कसबा पेठेतील नवग्रह मित्र मंडळाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आधी ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर हलते अन् जिवंत देखावे मंडळाकडून सादर केले जायचे... पण, वेगळी वाट शोधत मंडळाने जुन्या आणि प्राचीन मंदिरांच्या प्रतिकृती साकारण्यास सुरुवात केली अन् या आगळ्यावेगळ्या प्रयोगाला श्रीगणेश भक्तांचीही दाद मिळत आहे. यंदा उत्सवामध्ये तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिरांची प्रतिकृती सादर करण्यात येणार आहे. (Latest Pune News)
शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये अनेक श्रीगणेश मंडळे आहेत, ज्या मंडळांनी विविध उपक्रमांमधून उत्सवात वेगळी वाट शोधली आहे. नवग्रह मित्र मंडळाकडून असेच उपक्रम आयोजित केले जात असून, मंडळाचे यंदाचे 76 वे वर्ष आहे. (Ganesh Chaturthi)
उत्सवात श्रीगणेश भक्तांना देशविदेशा तील विविध जुन्या मंदिरांची माहिती व्हावी आणि त्यांना पुण्यातच ही मंदिरे पाहता यावीत, यासाठी मंदिराच्या प्रतिकृती साकारण्याची अभिनव संकल्पना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पुढे आली. उत्सवाच्या दरम्यान मंडळाकडून धार्मिक उपक्रमांसह साहसी खेळ, मर्दानी खेळांची प्रात्याक्षिके, पथनाट्याचे सादरीकरण, गंगा आरती असे उपक्रमही आयोजित केले जात आहेत.
मंडळाकडून राबविण्यात येणारे उपक्रम
व्याख्यानमाला
संगीत महोत्सवासह वेगवेगळ्या स्पर्धा
रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर
शालेय विद्यार्थ्यांनाशैक्षणिक साहित्याचे वाटप
मंडळाकडून दरवर्षी मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात येतेच. त्याशिवाय एक वही एक पेन बाप्पाच्या चरणी दान उपक्रमही आम्ही आयोजित करतो. या उपक्रमात श्रीगणेश भक्तांना श्रीगणरायाला दुर्वा, हार, फुले, नारळ, पेढे अर्पण करण्याऐवजी एक वही आणि एक पेन देण्याचे आवाहन केले जाते आणि उत्सवात जमा झालेले हे साहित्य मंडळाकडून गरजू विद्यार्थ्यांना दिले जाते. मागील वर्षी उपक्रमाअंतर्गत 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले होते. यंदाही हा उपक्रम आयोजित केला असून, 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान हा उपक्रम राबविला जाणार आहे.
- अनिकेत मुंदडा, नवग्रह मित्र मंडळ (कसबा पेठ)