खडकवासला: हॉलमधील सतरंज्यावर रिंगण करून बसलेली मुले-मुली, शाडूच्या मातीपासून बाप्पाची मूर्ती साकारण्यात गुंतलेले कोवळे हात आणि बाप्पाचे सगुण रूप पाहण्यात मग्न झालेली दृष्टी हे चित्र होते नर्हेतील ‘नालंदाज् गुरुकुल’मध्ये पार पडलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे.
दैनिक ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या ‘माझा बाप्पा: शाडू मातीची मूर्ती, पर्यावरणाला स्फूर्ती’ या उपक्रमात धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या नालंदाज् गुरुकुल’मधील शेकडो विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आणि त्यांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारल्या. (Latest Pune News)
नर्हे येथील नालंदाज् गुरुकुलमध्ये बुधवार (दि. 20) रोजी दैनिक पुढारीच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ‘भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट’चे प्राध्यापक सुनील देशपांडे आणि त्यांच्या सहकार्यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम तसेच या शाडू मातीच्या मूर्ती आपण घरातच विसर्जित करू शकतो, याने पर्यावरणावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत . जलप्रदूषण होणार नाही, याची माहिती प्राध्यापक देशपांडे यांनी दिली विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या गणेशमूर्ती विद्यार्थ्यांनी घरी प्रतिष्ठापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची ग्वाही दिली. या वेळी विद्यालयाच्या प्राचार्य वंदना काकडे, समन्वयक श्रद्धा बाम व अन्य शिक्षिका उपस्थित होत्या.
या कार्यशाळेला पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या कार्यशाळेचे मुख्य प्रायोजक सॉलिटर ग्रुप, सहप्रायोजक गोयलगंगा ग्रुप आहे. एज्युकेशन पार्टनर भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे, एनव्हायरमेंट पार्टनर ऑटोट्रॉनिक्स इंजिनिअरिंग प्रा.लि आहेत.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दैनिक पुढारीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘पर्यावरणपूरक गणपती ’ हा एक स्तुत्य उपक्रम आहे. यातून प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे.
- अनिकेत काकासाहेब चव्हाण, संचालक, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान
‘दैनिक पुढारी’च्यावतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशोत्सव कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाची ओढ निर्माण होण्यासाठी हा उपक्रम लाभदायक आहे. दैनिक पुढारीचे मन:पूर्वक आभार
वंदना काकडे, प्राचार्य, नालंदाज् गुरुकुल, नर्हे