Pune Rain: ओंकारेश्वरला जलाभिषेक! पुलाची वाडी, खिलारे वस्ती, एकतानगरीमध्ये शिरले पाणी

तब्बल 39 हजार क्युसेकने पात्रात झेपावतेय पाणी; मुठा फुगली
Pune Rain News
ओंकारेश्वरला जलाभिषेक! पुलाची वाडी, खिलारे वस्ती, एकतानगरीमध्ये शिरले पाणी Pudhari
Published on
Updated on

पुणे: दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून बुधवारी (दि. 20) सकाळी 39 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शहरातील मुठा नदीपात्र फुगले. नदीकाठावरील खिलारे वस्ती आणि पुलाची वाडीतील प्रेमनगर झोपडपट्टी भागात पाणी शिरले. मागील पुराचा अनुभव लक्षात घेत महापालिका प्रशासन अलर्ट झाले आणि त्यांनी पाणी शिरण्यापूर्वीच कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.

गेले दोन दिवस पानशेत खोर्‍यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री धरणातून 35 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता. त्या वेळी सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी भागात असलेल्या काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. (Latest Pune News)

Pune Rain News
Maharashtra flood situation: ‘राज्यातील पूरस्थिती नियंत्रणात’

बुधवारी पानशेत खोर्‍यात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे 39 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे एकतानगरीतील अनेक सोसायट्यांमध्ये आणि डेक्कन परिसरातील खिलारेवस्ती, पुलाची वाडीतील प्रेमनगर झोपडपट्टीसह पाटील इस्टेट भागातही काही ठिकाणी पाणी शिरले होते.

1498 नागरिक सुरक्षित स्थळी

शहर आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे नदीकाठच्या सिंहगड रोडवरील एकतानगरी, वारजे येथील रजपूतवस्ती, तपोधाम, तसेच येरवड्यातील फुलेनगर, चिमा गार्डन, पर्णकुटी आणि शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट, ताडीवाला रोडसारख्या अनेक भागांमधील सोसायट्या व घरांमध्ये पाणी शिरले. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत 404 कुटुंबांतील एकूण 1,498 नागरिकांना महापालिकेच्या 12 निवारा केंद्रांमध्ये तात्पुरते स्थलांतरित केले.

सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगरी, वारजे येथील रजपूत झोपडपट्टी, तपोधाम, येरवडा भागात फुलेनगर, चिमा गार्डन, पर्णकुटी, शांतीनगर, विश्रांतवाडी, साईनाथनगर, बोपोडीतील आदर्शनगर, मंगळवार पेठ, नागझरी नाला, भीमनगर, शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट, ताडीवाला रस्ता या नदीकाठच्या भागातील सोसायटी, घरांमध्ये पाणी शिरले. मात्र, महापालिकेची यंत्रणा मदतीसाठी तैनात करण्यात आली होती.

महापालिकेने पूरबाधित 404 कुटुंबातील 1498 नागरिकांना पालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरते स्थलांतरित केले. महापालिकेने संबंधित 33 ठिकाणी एकूण 71 मदतकेंद्रांची स्थापना केली आहे. या ठिकाणी महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून सर्च अँड रेस्क्यू टीम्स उपलब्ध करून दिली आहेत.

Pune Rain News
Ganeshotsav: गणेशोत्सवाला युनेस्कोचा सांस्कृतिक दर्जा मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करणार; आशिष शेलार यांची माहिती

महापालिका आयुक्तांकडून पूरभागात पाहणी

नागरिकांना मेगाफोनद्वारे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणेबाबत सूचना दिल्या जात आहेत. पाण्याचे उपसा करणारे पंप तैनात करण्यात आलेले आहेत. किमान 25 कामगारांचे पथक तैनात केलेले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीदेखील एकतानगर येथे घटनास्थळी जाऊन पूर परिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. तर, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी वारजे, कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय, शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालय व येरवडा क्षेत्रिय कार्यालय या ठिकाणी पुराने बाधित होणार्‍या ठिकाणी पाहणी केली आहे.

सेनादलाकडून एक टीम तैनात

महापालिकेसाठी सेनादलाकडून 1 टीम तैनात ठेवण्यात आली असून, त्यामध्ये 1 अधिकारी, 5 जेसिओ व 85 जवान यांची नियुक्ती करण्यात आली असून, समन्वय अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षात नियुक्त करण्यात आले आहेत. सैन्यदलासोबत आवश्यक ती सर्व साधनसामग्रीचा समावेश आहे.

सोमवारी दुपारपासून महापालिकेची यंत्रणा कामाला

सोमवारी दुपारपासून महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्ष, अग्निशामक दलाचे अधिकारी, याचबरोबरच महापालिकेने पाचारण केलेल्या लष्कराचे जवानांनाही सतर्क ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री अकरा वाजता महापालिका प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी हजर होते. पाणी वाढत असल्याने त्यांनी नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केले, त्यास काही नागरिकांनी प्रतिसाद दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news