

पुणे: यंदाचा गणेशोत्सव १२ दिवस साजरा होणार आहे. २०१७ नंतर पुन्हा हा योग जुळून आला. याशिवाय हरितालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) असल्याने यंदाच्या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सोमवारी ब्राह्ममुहूर्ताला पहाटे ४ वाजून ५० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५१ वाजेपर्यंत घरगुती श्रीगणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पूजन करावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा माध्यान्हानंतर देखील करता येऊ शकते. अनंत चतुर्दशी शुक्रवारी (दि. २५) आहे.
सोमवारी (दि. १४) सूर्योदयाच्या वेळी हरितालिका तृतीया असेल. सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी तृतीया समाप्त होऊन त्यानंतर श्रीगणेश चतुर्थी सुरू होईल. हरितालिका तृतीयेसाठी सूर्योदयव्यापिनी तृतीया आवश्यक असते, तर श्रीगणेश चतुर्थीकरिता चतुर्थी तिथी माध्यान्हकालव्यापिनी असावी लागते. सोमवारी सूर्योदयकाली तृतीया आणि माध्यान्ही चतुर्थी असल्याने ही दोन्हीही व्रते एकाच दिवशी आलेली आहेत, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
हरितालिका आणि श्रीगणेश चतुर्थीचे कर्ते वेगवेगळे असल्याने दोन्ही पूजांच्या वेळेबाबत भाविकांनी संभ्रम बाळगण्याची गरज नाही. त्यामुळे तृतीया समाप्त होण्यापूर्वी किंवा समाप्त झाल्यानंतरही हरितालिकापूजन करता येईल.
तसेच, ७ वाजून ७ मिनिटांपूर्वी देखील श्रीगणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करता येईल. यंदा तृतीया आणि श्रीगणेश चतुर्थीच्या तिथींमध्ये क्षय किंवा वृद्धी नसल्याने गणेशोत्सवाचा कालावधी १२ दिवसांचा झाला आहे. तसेच, हरितालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी येण्याचा योग २००६ आणि २००९ मध्ये आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हरितालिकेचा उपवास सोमवारी (दि. १४) करून मंगळवारी (दि. १५) सोडावा तसेच ऋषिपंचमीचा उपवास असणाऱ्यांनी हरितालिकेची उत्तरपूजा करून त्यानंतर उपवास सोडावा आणि मंगळवारी ऋषिपंचमीचे व्रत नेहमीप्रमाणे करावे, असेही त्यांनी सांगितले.
शाडू किंवा मातीच्या मूर्तीला प्राधान्य द्या!
आपल्याकडे जेवढ्या दिवसांचा गणेशोत्सव असेल तेवढे दिवस रोज श्रीगणेशाची सकाळी आणि सायंकाळी पूजा, आरती करावी. श्रीगणेशपूजन १० दिवस करणे शक्य नसेल तर पूजनाचे दिवस कमी करून १, ३, ५, ७ दिवस पूजन करून विसर्जन करता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन होणे आवश्यक आहे आणि ते पाण्यामध्ये करावे, असे धर्मशास्त्र सांगते.
वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून, पाण्यात विसर्जन करावे, असे आहे. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यातही विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी, असे आवाहनही मोहन दाते यांनी केले.
गौरीपूजनाचे दिवस :
गुरुवारी (दि. १७) गौरी आवाहन - अनुराधा नक्षत्रावर सायंकाळी ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंत कधीही गौरी आवाहन करता येईल.
शुक्रवारी (दि. १८) - गौरीपूजन नेहमीप्रमाणे गौरीपूजन करावे.
शनिवारी (दि. १९) गौरी विसर्जन - दिवसभरात कधीही गौरी विसर्जन करता येईल.
शुक्रवारी (दि. २५) अनंत चतुर्दशी आहे. श्रीगणेश चतुर्थीपासून हा १२ वा दिवस असल्याने अनंत चतुर्दशीला विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांकडे यंदा १२ दिवसांचा गणेशोत्सव असेल. पुढील वर्षी श्रीगणेश चतुर्थी ४ सप्टेंबर २०२७ रोजी येणार आहे.
- मोहन दाते, पंचांगकर्ते