PMP Fake App: पीएमपीच्या फेक ॲपचा धक्कादायक प्रकार! बनावट तिकिटांवर हजारो प्रवासी फुकट फिरल्याचा संशय

पीएमपीच्या बस प्रवासासाठी बनावट ॲपद्वारे फेक तिकिटे काढून महसूल बुडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
PMP Fake App
PMP Fake AppPudhari
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे: पीएमपीच्या बसने प्रवास करण्यासाठी एका बनावट (फेक) ॲपद्वारे बनावट तिकिटे काढून प्रशासनाचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रशासनाने तातडीने पावले उचलत आत्तापर्यंत दोघांवर गुन्हे दाखल केले असून, या घटनेमुळे पीएमपी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अशा प्रकारात आत्तापर्यंत दोन जण सापडले असले, तरी बनावट ॲपच्या माध्यमातून आत्तापर्यंत पीएमपीचा लाखोंचा गल्ला गायब केल्याचा आणि हजारोंनी फुकटात प्रवास केल्याचा संशय पीएमपीच्या वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

PMP Fake App
Pune Police: पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा दणका; अल्पवयीनांची धिंड काढणे भोवणार

दरम्यान, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पीएमपी प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या आणि महसूल गायब करणाऱ्या सायबर ठगांना आता अजिबात सोडणार नाही, असा इशारा पीएमपी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुण उच्चशिक्षित प्रवासी पीएमपीच्या ‌'आपली पीएमपीएमएल‌' ॲपची कॉपी असलेल्या एका अनधिकृत ॲपचा वापर करून हुबेहूब पीएमपीच्या तिकिटासारख्या डिजिटल तिकिटाने प्रवास करताना आढळले.

या वेळी पीएमपीच्या सतर्क वाहक (कंडक्टर) आणि चेकर यांनी हे बनावट तिकीट त्वरित ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यावर तत्काळ कारवाई करीत दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

आव्हाड यांनी अशाप्रकारे बोगस कारभार करणाऱ्यांचा सूत्रधार (सायबर ठग) शोधून त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे.

PMP Fake App
Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करा; सोनाली कांबळेंची मागणी

डेपो मॅनेजर, चेकर, वाहकांनो बोगस तिकिटांवर बारकाईने लक्ष द्या...

या गैरप्रकाराची गांभीर्याने दखल घेत पीएमपी प्रशासनाने तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत सर्व डेपो मॅनेजर, चेकर आणि वाहकांना अशा बोगस तिकिटांवर अत्यंत बारीक नजर ठेवण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रवाशांनी कोणत्याही फसव्या किंवा बनावट डिजिटल ॲपला बळी न पडता फक्त अधिकृत ‌'आपली पीएमपीएमएल‌' ॲपचाच तिकीट बुकिंगसाठी वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अँड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्यांनी प्लेस्टोअरवरून आणि आयफोन वापरकर्त्यांनी ॲप स्टोअरवरूनच पीएमपीचे ‌'आपली पीएमपीएमएल‌' ॲप डाऊनलोड करावे, अन्य कोणत्याही संकेतस्थळावरून अथवा एपीके फाइलच्या माध्यमातून बनावट ॲप डाऊनलोड करू नये, असेही आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

बनावट ॲपचा वापर करून पीएमपीचा महसूल बुडवणे, प्रशासनाची फसवणूक करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर आणि बनावट तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पीएमपी प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई केली जात आहे. प्रवाशांनी प्रवासासाठी फक्त अधिकृत प्लेस्टोअर आणि ॲप स्टोअरवरून ‌'आपली पीएमपीएमएल‌' ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा.

- महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news