

पुणे : शहरातील महापालिकेच्या वाहनतळावरच रमीचा डाव मांडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी बुधवारी (दि.३०) रात्री छापा टाकून ३२ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम आणि मोबाइलसह ४ लाख ९३ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महापालिकेच्या सरकारी जागेतच रमीचा डाव माडंण्यात असल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ३० जुलै रोजी रात्री नारायण पेठ चौकी हद्दीत असलेल्या महापालिकेच्या कै. हरीभाऊ साने वाहनतळाच्या टेरेसवरील बंद खोलीत काही जण रम्मी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान ३२ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख १ लाख ६० हजार ७७० रुपये, ३ लाख ३३ हजार रुपयांचे मोबाइल फोन आणि जुगार साहित्य असा एकूण ४ लाख ९३ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान हे वाहनतळ कोणाला चालविण्यास दिले आहे. याबाबतची माहिती मिळावी म्हणून महापालिकेशी पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे. याचा तपास सहाय्यक निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.