

पुणे: कौटुंबिक वादातून नांदण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून पतीने पत्नीचा चाकूने गळा कापून खून केला. ही घटना रविवारी (दि. 27) दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास खांदवेनगर लोहगावमध्ये घडली. खून करून फरार झालेल्या पतीला विमानतळ पोलिसांनी दोन तासांत बेड्या ठोकल्या आहेत.
ममता जाधव (वय 21, रा. काजळी तांडा, पिंपळगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती प्रेम उत्तम जाधव (वय 27, रा. काजळी तांडा, पिंपळगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) याला अटक करण्यात आली. (Latest Pune News)
याबाबत ममताची मावशी रेश्मा रामेश्वर राठोड (वय 28, रा. खांदवेनगर, लोहगाव) हिने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये प्रेम आणि ममताचा विवाह झाला होता. प्रेमला दारूचे व्यसन होते.
तसेच, तो तिला सतत जाच करीत होता. म्हणून मागील सहा महिन्यांपासून ममता खांदवेनगर लोहगावमध्ये आईसोबत राहण्यास आली होती. प्रेम फोन करून ममताला नांदण्यास ये म्हणत होता. परंतु, त्याने दारू सोडल्यानंतर ती नांदण्यास येणार, असे सांगत होती.
ममता हीदेखील आईसोबत काम करीत होती, तर फिर्यादी मावशी रेश्मा त्यांच्यासोबतच राहतात. रविवारी ममता आणि रेश्मा यांची सुटी असल्यामुळे त्या घरीच होत्या. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास प्रेम हा ममताला घरी घेऊन जाण्यास आला. त्या वेळी त्याच्या हातात पांढर्या रंगाची पिशवी होती.
तो घरात खुर्चीवर बसला होता, तर ममता बेडवर बसली होती. त्याने ममताच्या चुलत्याला फोन करून तिला नांदण्यास पाठवा, असे सांगितले. प्रेम याने त्यानंतर तो फोन ममताच्या मावशीकडे देऊन त्यांना बोलण्यास सांगितले. मावशी फोनवर बोलत खोलीबाहेर आली. दरम्यान, त्यांचा लहान मुलगा घरातून ओरडत बाहेर आला.
मावशी रेश्मा यांनी खोलीत जाऊन पाहिले असता, प्रेम डाव्या हाताने ममताचे तोंड दाबून उजव्या हाताने चाकूने तिचा गळा चिरत होता. ममताच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. रेश्मा यांनी प्रेमचा हात पकडून त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याने रेश्मा यांच्यावर देखील वार केला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, त्या वेळी तो धक्का मारून पळून गेला. ममता रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडली होती.
रेश्मा यांनी आरडाओरडा केला तेव्हा शेजारी राहणारे काही लोक धावत आले. त्यांनी ममताला रिक्षातून जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखम मोठी असल्याने त्यांनी तिला ससून रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यांना तत्काळ रुग्णवाहिका मिळाली नाही. रस्त्यावरील एका मोटारचालकाच्या मदतीने ममताला ससून रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून ममताचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सोमय मुंंडे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सपना देवतळे, समीर करपे, पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर तपासाची चक्रे गतिमान करीत अवघ्या दोन तासांत आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली.