पुणे : अग्निपथ भरतीसाठी बनावट डोमिसाईल काढून देणारे गजाआड

पुणे : अग्निपथ भरतीसाठी बनावट डोमिसाईल काढून देणारे गजाआड

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सैन्य दलातील अग्निपथ योजनेमार्फत होणार्‍या भरतीसाठी मुंबई परिसरात वास्तव्यास असलेले बनावट डोमिसाईल (रहिवासी दाखला) काढून देणार्‍या दोघा एजंटना गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-बंगलोर हायवे वडगाव बुद्रुक परिसरातून बेड्या ठोकल्या. पोपट विठ्ठल आलंदार (वय 38) आणि सुरेश पितांबर खरात (वय 31, दोघेही रा. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून बनावट रबरी शिक्के, कोरे शाळा सोडल्याचे दाखले, डोमिसाईल प्रमाणपत्र, रोख रक्कम, इतर दस्त, मोबाईल, कार असा 4 लाख 55 हजार 700 रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार राहुल होळकर यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या संरक्षण दलामध्ये अग्निपथ ही सैन्य भरतीची नवी योजना आणली आहे. त्यासाठी मुंबई येथे भरती होणार आहे. त्याची नुकतीच जाहिरात आली होती. प्रत्येक विभागानुसार ही भरती होत असून, त्याच विभागातील स्थानिक उमेदवारांना भरतीची संधी दिली जाते, या जाहिरातीवरून काही अ‍ॅकॅडमींनी उमेदवारांशी संपर्क साधला.

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील उमेदवारच भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. अन्य ठिकाणी राहणारे येथे भरतीमध्ये सहभागी होऊ शकत नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे दाखविण्यासाठी या एजंटांनी बनावट शाळा सोडल्याचे दाखले, भाडेकरार, सरपंचांचा दाखला अशी कागदपत्रे तयार केली. त्या आधारे सेतू केंद्रातून डोमिसाईल प्रमाणपत्र तयार करून घेतले आहे.

अशी कागदपत्रे असलेले दोघे जण मुंबई- पुणे- बंगलोर महामार्गावरील वडगाव येथील दांगट पाटील एम्पायर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मिळालेले बनावट रबरी शिक्के, कोरे शाळा सोडल्याचे दाखले याची पोलिसांनी चौकशी केली. त्यातून हा प्रकार समोर आला आहे. पोपट आलंदर हा मुळचा सांगोल्याचा असून, तो पूर्वी सैन्य दलातील भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था चालवत होता. गेल्या काही दिवसापासून त्याची ही संस्था बंद आहे.

2018 पासून चेंबूर परिसरात वास्तव्यास आहे. मैदानी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना रहिवासी दाखला मागितला जातो. त्यातूनच त्याने अशा उमेदवारांना हेरून हा उद्योग सुरू केल्याचे तपासात समोर आले आहे. अशा प्रकारे त्यांनी 30 ते 40 परीक्षार्थींचे डोमिसाईल तयार करून घेतल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर अधिक तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news