

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : एजंटला दोन लाख रुपये देऊन लग्न करण्याचा उद्योग देलवडी (ता. दौंड) येथील एकाच्या चांगलाच अंगलट आला; परंतु दै. 'पुढारी' तील बातमीमुळे सावध असल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी सांडू यशवंत जाधव(रा. मड, जि. बुलढाणा) सतीश मधुकर जोशी (रा. अशोकनगर, सातपूर, नाशिक), चित्रा कैलास अंधोरे (रा. मनमाड, रामलालनगर, आनंदगाव, जि. नाशिक), आशा नानासाहेब निकम (रा. नाशिक जेल रोड), ज्योती रवींद्र लोखंडे (चाचडगाव, तांडीडोरी, जि. नाशिक), मेघा गोपाळ सोळंकी (रा. नाशिक पंचवटी) आणि आकाश दिनेश कुठे (रा. देवळाली गाव, फुलेनगर, नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एजंटला दोन लाख रुपये देऊन चित्रा कैलास अंभोरे हिच्याशी फिर्यादीचे नाशिक येथील घारपुरे घाट अशोक स्तंभ येथील साई वैद्यकीय विवाहसंस्था येथे लग्न लावून दिले. त्या वेळी त्यांच्याकडून विवाह प्रमाणपत्र घेतले. लग्न केल्यानंतर देलवडी येथे परत येत असतानाच चित्रा हिचे वर्तन संशयास्पद होते, त्यातच अशा प्रकारे एजंटला पैसे देऊन लग्न केल्याच्या प्रकरणात फसवणूक झाल्याची शिरूर तालुक्यातील तांदळी गावातील घटना दै. 'पुढारी'मध्ये दि. 16 डिसेंबर रोजी प्रकाशित झाली होती, त्यामुळे फिर्यादीचे कुटुंब सावध होते. 17 डिसेंबर रोजी अगदी तशीच फसवणूक होण्यापासून फिर्यादींची सुटका झाली. 17 डिसेंबर रोजी पाच वाजताच्या सुमारास चारचाकी गाडी( एम एच 46-16644) मधून नानासाहेब निकम, ज्योती रवींद्र लोखंडे, मेघा गोपाळ सोळंकी आणि गाडीचालक आकाश दिनेश हे फिर्यादीच्या घरी आले. निकम फिर्यादीला म्हणाला की, 'चित्रा हिला आमच्याबरोबर पाठवा. तिला काही दागिने करायचे आहेत.' फिर्यादीने नकार देताच त्यांच्याकडून शिवीगाळ, दमबाजी करण्याचा प्रकार सुरू झाला, हे लक्षात येताच फिर्यादी यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आलेली आहे.
हेही वाचा :