Pune Political News: पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गतवेळच्या उमेदवार अश्विनी कदम यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्याने यंदाही पर्वतीमध्ये 2019 च्या निवडणुकीप्रमाणेच भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आणि अश्विनी कदम अशी लढत होईल.
या शिवाय बंडखोरी करून काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागूल हे अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सचिन तावरे हेसुद्धा अपक्ष निवडणूक लढविणार असल्याने येथील लढत चौरंगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मिसाळ या सलग तीनवेळा पर्वतीमधून विजयी झाल्या आहेत. गतवेळच्या निवडणुकीतील पालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम या पराभूत झाल्या होत्या. त्यांनाच पक्षाने यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.
यामधील तिन्ही उमेदवार हे येत्या सोमवारी (दि. 28) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले. मिसाळ या कार्यकर्त्यांसह सारसबाग चौकात सर्वजण जमून निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
अश्विनी कदम यासुद्धा सोमवारीच अर्ज भरणार आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते आबा बागूल यांनी निवडणूक अर्ज यापूर्वीच भरला आहे. बागूल यांच्या समर्थनार्थ शनिवारी वाळवेकर लॉन्स येथे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. या वेळी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला आहे.
तसेच या निवडणुकीत पर्वतीमध्ये ‘पर्वती पॅटर्न’ चालवायचा असून, वेळप्रसंगी पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी पदाधिकार्यांनी ठेवल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सचिन तावरे हेसुद्धा निवडणूक लढविणार आहेत. ते म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या पाठिंब्यावर मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरत आहे.
पर्वतीमध्ये सुमारे एक लाख तीस हजार मराठा मतदार आहेत. प्रमुख सर्व उमेदवारांमध्ये मीच मराठा उमेदवार आहे. मुस्लिम मतदारांचीही मला साथ मिळणे अपेक्षित असून, आपण सोमवारी मतदारसंघात सकाळी अकरा वाजता फिरून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार असलेल्या मनपाचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर होताच शंभर टक्के नाराज असल्याचा सूर आळवला होता. शनिवारी (दि.26) ते मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यास गेल्याचे समजले. त्यामुळे ते निवडणूक लढविणार की घोषित केलेले त्यांचे बंड थंड होणार, हे चित्र लवकरच स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.