चांदवड : चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मायबाप जनतेने सन २०१४ पासून मला दिली. तेव्हापासून आजपर्यंत प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका माझी राहिली आहे. या १० वर्षांत गावागावातील राजकीय जोडे बाजूला ठेवून प्रत्येक गावाचा विकास कसा करता येईल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे काम केले आहे. या कामाच्या पावती स्वरूपात गावागावातील जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत. त्यामुळेच चांदवड - देवळा मतदारसंघात महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ताकदीसमोर कोणाचाही टिकाव लागणार नाही. परिणामस्वरूप येत्या २३ नोव्हेंबरला आपला विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.
येथील रेणुका मंगल कार्यालयामध्ये आयोजित महायुतीच्या कार्यकर्त्यां मेळाव्यात आमदार डॉ. राहुल आहेर बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष शंकर वाघ, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, विलासराव ढोमसे, बाळासाहेब वाघ, बाळा पाडवी, अशोक भोसले, मोहन शर्मा, डॉ. नितीन गांगुर्डे, बाळासाहेब क्षीरसागर, डॉ. बाळासाहेब आहेर, राजेंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
शेतीसाठी दिवसा वीज मिळावी यासाठी सोलर प्रकल्प योजना सुरू केली आहे. तालुक्यातील शिंदे गावाच्या परिसरात २५ एकरमध्ये सोलर प्लांट होत आहे. तो लवकरच कार्यान्वित होणार असून, शिंदे गावासह तीन ते चार गावांना दिवसा वीज मिळणार आहे. याच धर्तीवर इतर गावांमध्ये सोलर प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले.
तालुक्यातील पुणेगाव - दरसवाडी पोहोच कालवा, माकडडोह, राहूड ऊसवाड पाटचारी आदी जलसिंचनाची कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाणी प्रश्न सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे. त्याचप्रमाणे पार गोदावरी प्रकल्प, कानमंडाळे ते खोकड तलाव दरम्यानचा हायराईज कॅनॉलचे राहिलेले काम येत्या वर्षभरात पूर्ण करून संपूर्ण चांदवड तालुका दुष्काळमुक्त करण्याची ग्वाही आमदार डॉ. राहुल आहेर यांनी यावेळी दिली.
चांदवड - देवळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर हे सोमवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करणार आहेत. यासाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनोज शिंदे, रघुनाथ आहेर, नीलेश ढगे यांनी केले आहे. सोमवारी (दि. २८) सकाळी १० वाजता येथील चंद्रभागा लॉन्स येथे महायुतीद्वारे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी जाहीर सभा होऊन निवडणुकीचा एल्गार करण्यात येणार आहे. त्यानंतर चांदवड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ते तिसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक रणांगणात उतरले आहेत.
विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण शनिवारी (दि. २६) मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी सकाळच्या सत्रात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी असे १,०६१ मतदान कर्मचारी, तर दुपारच्या सत्रात ९७३ मतदान कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. मतदान यंत्र हाताळण्याबाबतचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. नियुक्त कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून टपाली मतदानासाठी नमुना १२ आणि १२ अ जमा करून घेण्यात आले. प्रशिक्षणाचे नियोजन निवासी नायब तहसीलदार विजय कचवे, प्रशासन नायब तहसीलदार बाबासाहेब खेडकर, निवडणूक नायब तहसीलदार डॉ. मीनाक्षी गोसावी आदींनी केले होते.