पुणे: एसटीच्या पुणे विभागाने कठोर भूमिका घेत विभागातील चार चालकांना बडतर्फ केले आहे, तर आणखी चार जणांची चौकशी सुरू असून, ते सध्या निलंबित आहेत. त्यांच्यावरही कडक कारवाई होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दारू पिऊन गाडी चालवणार्या एसटीच्या एका चालकाचा नुकताच व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या पुणे विभागातील विभाग नियंत्रकांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. (Latest Pune News)
अनेकदा दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे मोठे अपघात घडतात. हे रोखण्यासाठी एसटी आणि पीएमपीएमएलच्या बसचालकांची रोजच्या रोज बस संचलनासाठी नेताना ब—ेथ अॅनेलायझर तपासणी होणे आवश्यक आहे. असे न केल्यास जर एखादा चालक दारू पिऊन गाडी चालवत असेल, तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे गांभीर्याने पाहत, बसचालकांची ब्रेथ अॅनेलायझर तपासणी वेळेवर कशी होईल, याकडे लक्ष द्यायला हवे.
...अशी होणार तपासणी मोहीम
सर्व आगारांना (डेपोंना) सकाळी गाडी बाहेर काढण्यापूर्वी आणि प्रत्येक शिफ्ट बदलण्यापूर्वी चालक ब्रेथ अॅनालायझर चाचणीतून जाणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात कडक अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रवाशांचा जीव आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा आहे. दारू पिऊन वाहन चालवणे हा एक गंभीर गुन्हा आहे आणि आम्ही तो अजिबात सहन करणार नाही. या कठोर उपाययोजनांमुळे चालकांमध्ये शिस्त येईल आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. भविष्यातही अशा प्रकरणांवर आमची बारीक नजर राहील आणि दोषींना कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. या कडक पावलांमुळे एसटी प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढणार असून, चालकांमध्येही नियमांचे पालन करण्याची सक्ती निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी, पुणे विभाग.
दारू पिऊन बस चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. दारू पिऊन बस चालवल्यास प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यांनी बसचालकांच्या ब्रेथ अॅनेलायझर तपासणीवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि कडक कारवाई करावी. तसेच, बससह इतर वाहनचालकांचीही ब्रेथ अॅनेलायझर तपासणी दररोज व्हायला हवी.
- सिद्धेश वाघ, वाहनचालक