PMPML 200 CNG buses
पुणे: पीएमपीच्या ताफ्यात लवकरच स्वमालकीच्या 200 नवीन सीएनजी बस दाखल होणार आहेत. या बस सप्टेंबर 2025 पासून ताफ्यात येण्यास सुरुवात होईल. या ताफ्यात आल्यामुळे बसमध्ये होणारी गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
टाटा कंपनीकडून खरेदी करण्यात येणार्या या बस लखनौमधून पुण्यात आणल्या जाणार आहेत. पीएमपीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी नुकतीच लखनौमध्ये जाऊन यासंदर्भात पाहणी केली आहे. या 200 बस खरेदी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांनी पीएमपीला आर्थिक मदत केली आहे. प्रत्येक बसची किंमत सुमारे 46 लाख रुपये असून, एकूण 200 बससाठी दोन्ही महापालिकांनी आर्थिक पाठबळ दिले आहे. (Latest Pune News)
भाडेतत्त्वावरील 400 पैकी 360 बस ताफ्यात दाखल
पीएमपीच्या ताफ्यात नुकत्याच 400 भाडेतत्त्वावरील नवीन सीएनजी बस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. 400 पैकी 360 बस आत्तापर्यंत दाखल झाल्या असून, उर्वरित 40 बसदेखील चालू महिन्याच्या अखेरपर्यंत पीएमपीच्या ताफ्यात येतील. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रवाशांना उत्तम आणि आरामदायी प्रवास सुविधा देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. या नवीन 200 सीएनजी बसमुळे पीएमपीच्या सेवेत नक्कीच सुधारणा होईल. यामुळे केवळ गर्दीच कमी होणार नाही, तर पर्यावरणाची काळजी घेणार्या सीएनजी बसमुळे प्रदूषण नियंत्रणासही मदत होईल. दोन्ही महानगरपालिकांच्या आर्थिक मदतीमुळे हे शक्य झाले आहे आणि आम्ही लवकरच या बस सेवेत दाखल करण्यासाठी उत्सुक आहोत.
- नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
दररोज बसमध्ये खूप गर्दी असते आणि प्रवास करणे खूप कठीण होते.सकाळी आणि संध्याकाळी तर बसमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. या नवीन बस आल्या, तर नक्कीच आम्हाला खूप मोठा दिलासा मिळेल. यामुळे वेळेची बचत होईल आणि प्रवासाचा ताणही कमी होईल. पीएमपीचा हा निर्णय खूप चांगला आहे.
- रवी मेंगडे, प्रवासी