

पुणे: मान्सून भारताच्या सीमेजवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे तो केरळात कधीही दाखल होऊ शकतो. केरळसह तामिळनाडू राज्याला आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी 20 मे रोजी संपूर्ण राज्याला ऑरेंज अलर्ट तर कोकणला 21 रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सूनची प्रचंड वेगाने वाटचाल सुरू असून 19 मे रोजी श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताकडे येण्यास कूच केले. त्यामुळे केरळ, तामिळनाडू या राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Pune News)
भारतीय किनारपट्टीला 20 मे रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मान्सून केरळमध्ये आगामी काही तासांत कधीही दाखल होवू शकतो, अशी स्थिती यंदा तयार झाली आहे. मान्सून यंदा 27 मे पर्यंत दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र तो त्यापेक्षा खूप आधी म्हणजे 21 ते 22 मे दरम्यान दाखल होईल, अशी स्थिती सध्याचा पाऊस पाहता दिसत आहे.
कोकणला 21 रोजी रेड अलर्ट..
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीला 21 मे रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हा पाऊस 22 मे पर्यंत राहणार असून 23 मे नंतर कमी होईल असा प्राथमिक अंदाज आहे.
केरळमध्ये 24 तासांत आल्यास विक्रम ठरेल...
मान्सून केरळमध्ये 21 किंवा 22 मे दरम्यान दाखल होईल अशी स्थिती सोमवारी रात्री दिसून आली. आजवर केरळ मध्ये तो 28 मे पर्यंत आल्याच्या नोंदी आहेत. मात्र तो जर 20 मे पर्यंत केरळात आल्यास गत शंभर वर्षातील विक्रम ठरेल, असा दावा हवामान शास्त्रज्ञांनी केला आहे.
महाराष्ट्रावर उच्च स्तरावरील चक्रीय वार्यांचे परिसंचरण होत आहे, त्यामुळे कोकण ,मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आर्द्रता येत आहे. पुणे जिल्ह्यासाठी पुढील 48 तासांसाठी तीव्र पावसाच्या सरींसह वीज आणि गडगडाट यांचा इशारा देण्यात आला असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट विभागांमध्ये तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 4-5 दिवस तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट कायम राहण्याची शक्यता आहे. 21 ते 23 मे दरम्यान पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील घाटांमध्ये जाणे टाळा. कमी दृश्यमानता, ओले व घसरडे रस्ते, तात्पुरते पूर यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
-डॉ अनुपम कश्यपी,माजी विभाग प्रमुख हवामान विभाग पुणे