Ex-Army Chief Naravane: "गलवान घटनेनंतर भारत...": चीनसोबतच्या सीमावादावर माजी लष्करप्रमुख नरवणे यांचं मोठं वक्तव्य

चीनच्या दृष्टिकोनातून सीमावादावर लष्करी उपाय हा पर्याय आता पूर्णपणे बाद झाला आहे, हे गलवान घटनेने स्पष्ट केले असल्याचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे.
General Manoj Naravane
General Manoj Naravanefile photo
Published on: 
Updated on: 

Ex-Army Chief Naravane on India-China Border & Galwan Clash

पुणे : "भारताच्या पश्चिम आणि उत्तरेकडील शेजारी देशांचे आव्हान मोठे असले, तरी त्याचा अर्थ भारताने नेहमीच युद्ध किंवा संघर्षाच्या छायेत राहावे असा होत नाही. वाद आणि मतभेद संवादाच्या माध्यमातून सोडवण्यालाच भारताचे पहिले प्राधान्य असायला हवे," असे प्रतिपादन निवृत्त माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी केले. चीनच्या दृष्टिकोनातून सीमावादावर लष्करी उपाय हा पर्याय आता पूर्णपणे बाद झाला आहे, हे गलवान घटनेने स्पष्ट केले असल्याचेही नरवणे यांनी सांगितले.

पुण्यातील आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील व्यावसायिकांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चीनसोबतच्या सीमावादाबाबत बोलताना नरवणे म्हणाले की, भारत आणि चीनमधील सीमा अद्याप पूर्णपणे निश्चित झालेली नाही. आंतरराष्ट्रीय सीमेप्रमाणे या सीमेला पूर्ण मान्यता मिळालेली नसल्यामुळेच मी 'बाउंड्री' या शब्दाचा वापर करत आहे. ज्या भागांत दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत, तिथे यापूर्वी चकमकी झाल्या आहेत आणि भविष्यातही तशी शक्यता नाकारता येत नाही. गलवान खोऱ्यातील हिंसक चकमक हीदेखील अशीच एक घटना होती.

General Manoj Naravane
Hospital overcharging: रुग्णांकडून जादा पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई होणार; सर्वोच्च न्यायालयात सरकारची ग्वाही

मात्र, गलवानच्या घटनेनंतर चीनसोबतच्या सीमावादावर लष्करी बळाचा वापर हा एकमेव पर्याय उरलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. ताकदीच्या जोरावर एकतर्फी सीमा बदलण्याचा कोणताही प्रयत्न भारत खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा भारताने दिला आहे. यामुळे परिस्थितीत सकारात्मक बदल झाला असून संवादाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमधील चर्चा या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरते, असेही त्यांनी नमूद केले.

लष्करी व कूटनैतिक पातळीवर भारत मजबूत

गलवान घटनेतून मिळालेला सर्वात मोठा धडा म्हणजे जागतिक स्तरावर भारताने आपली स्थिती भक्कम केली आहे. यामध्ये लष्करी, कूटनैतिक आणि राजकीय अशा तिन्ही आघाड्यांचा समावेश आहे. बळाचा वापर हा भारतासाठी शेवटचा पर्याय असायला हवा. मात्र, याचा अर्थ गरजेच्या वेळी भारत मागे हटेल असा अजिबात होत नाही, असा पुनरुच्चार नरवणे यांनी केला.

'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत ते म्हणाले की, त्या कारवाईद्वारे भारताने स्पष्ट संदेश दिला होता की, आता खूप झाले असून अशा कारवाया भारत यापुढे सहन करणार नाही. शत्रूला जिथे सर्वाधिक फटका बसेल, तिथेच भारत प्रहार करेल. निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य झाल्यामुळेच भारताने ऑपरेशन सिंदूर थांबवले. ते पुढे सुरू ठेवता आले असते, परंतु त्यानंतर युद्ध कधी थांबवायचे हे आपल्या हातात राहिले नसते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

General Manoj Naravane
Shraddha Dube: मॉडेल श्रद्धा दुबे मुंबईत कुख्यात गँगस्टर झुल्फीला भेटायला यायची; क्लबमध्ये झाली होती भेट, धक्कादायक माहिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news