

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक हिताचा उद्देश बाजूला ठेवून सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीत अनियमितता करणार्या पदाधिकार्यांविरुद्ध आरोप होत असतानाही विद्यमान अध्यक्षांनी मौन धारण केले आहे. संस्थेविरुद्ध धर्मादाय आणि उच्च न्यायालयात प्रकरण सुनावणीसाठी असताना विद्यमान अध्यक्ष उपचारांसाठी जर्मनीला गेल्याचे समजते, तर दुसरीकडे संस्थेच्या विद्यमान सचिवांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनमध्ये सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सचिव मिलिंद देशमुख यांनी रानडे ट्रस्टच्या विश्वस्तांविरोधात तक्रार केल्याचे समोर आले आहे. यात पोलिसांनी संबंधित तक्रारीवर जबाब मागण्यासाठी रानडे ट्रस्टच्या विश्वस्तांना वेळ दिला.
तक्रार अर्जावरील आत्मानंद मिश्रा यांच्या सहीच्या अधिकृततेबाबतही साशंकता निर्माण झाल्याचे समजते. मिश्रा यांना मराठी भाषा येत नसल्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रानडे ट्रस्ट ही सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या आधी स्थापन झालेली असून, त्याबाबतचे सर्व अधिकृत दस्तऐवज कोर्टासहित धर्मादाय आयुक्त यांच्याकडे आहेत. मात्र, याबाबतच्या तक्रारीमध्ये सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी आधी स्थापन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नक्की खरे काय? असा संभ—म निर्माण झाला आहे. आत्मानंद मिश्रा हे सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचे वरिष्ठ विश्वस्त असून, त्यांना मराठी भाषेतील काहीच माहिती स्पष्ट होत नाही. त्यामुळे त्यांच्या सह्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सोबतच रानडे ट्रस्टची 16 एकर जमीन सागर काळे, शिवाजी धनकवडे आणि स्वतः मिलिंद देशमुख यांनी नावावर करून घेतली. त्याला रानडे ट्रस्टच्या विश्वस्तांनी आक्षेप घेतला. त्या प्रकरणात पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास विलंब केला आणि नंतर संबंधितांना जबाब देण्याच्या नोटिसा बजाविल्या. मात्र, देशमुखांच्या तक्रारीवरून पोलिस प्रशासनाने विनाविलंब कार्यवाहीसाठी रानडे ट्रस्टच्या विश्वस्तांबद्दल घेतलेली दखल ही पोलिसांची तत्परता विचार करायला लावणारी असून, आत्मानंद मिश्रा यांनी रानडे ट्रस्टविरोधात केलेली तक्रार स्वतः मागे घेतली, हे खरेच. सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीचा राखीव निधी न्यायालयीन प्रकरणांमध्ये वापरला जात असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात राखीव निधी वापरायचा असेल, तर बैठकीत इतर सदस्यांची मंजुरी घेणे गरजेचे असते. मात्र, तसे करण्यात आलेले नाही.
हेही वाचा :