

खेड: मुलीची छेड काढणाऱ्या आरोपी आणि त्याच्या मित्राशी वाद उफाळुन आल्यावर मुलीच्या वडिलावर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना कडूस (ता. खेड) मंगळवारी (दि. ३) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
संतोष बबन ढमाले (वय ४०, रा. कडूस) यांचा या घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यामध्ये किरण शिवाजी खंडागळे आणि प्रणय प्रमोद नवले (दोघेही रा. कडूस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक गारगोटे (वय ५०, रा. कारामळी, ता. खेड) आणि मयत संतोष ढमाले हे मित्र आहेत. ते एकत्र चेतन बारमधून दारू पिऊन बाहेर पडले होते. त्याचवेळी बारच्या समोर उभे असलेले आरोपी किरण खंडागळे आणि प्रणय नवले यांच्याशी संतोष त्यांचा वाद झाला.
प्रणय नवले याने संतोष यांच्या मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून हा वाद उफाळला. वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. दोन्ही आरोपींनी बरोबर लपवून आणलेल्या कोयत्याने संतोष यांच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
संतोष खाली पडल्यानंतर फिर्यादी अशोक घाबरून पळाले आणि नंतर संतोष यांच्या कुटुंबीयांना घेऊन घटनास्थळी परतले. तेव्हा संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. संतोष यांना तातडीने चाकण येथील युनिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
खेड पोलीस ठाण्यात फिर्यादी अशोक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे.