

वडगाव निंबाळकर: गत आठवड्यात झालेल्या पावसाने जवळपास वर्षाची सरासरी गाठली आहे. अशी स्थिती असताना आता हवामानतज्ज्ञांनी पुन्हा पुढील आठवड्यात पाऊस सुरू होईल,असे सांगितल्याने बारामती तालुक्यातील शेतकरीवर्ग कमालीचा धास्तावला आहे. पाऊस सुरू झाला तर यंदा ओल्या दुष्काळालाच तोंड द्यावे लागेल,अशी स्थिती आहे.
आधीच अवकाळी पावसाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतजमिनीचे आणि शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आजही शेतातून पाणी वाहत आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पुढील शेतीकामासाठी जमिनीला वाफसा येणे अत्यंत गरजेचे बनले आहे. (Latest Pune News)
पण शेतजमिनीला वाफसा येण्यापूर्वीच पुन्हा पाऊस सुरू झाला तर ओला दुष्काळच पडेल अशी भीती शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे. त्यामुळे हवामान तज्ज्ञाच्या या सूचनेनंतर शेतकरी घाबरल्याचे चित्र दिसत आहे.
1 जुलैपासून परिसरातील साखर कारखान्यांनी आपला 2025 -26 चा ऊस लागण हंगाम जाहीर केला आहे. त्यानुसार ऊस लागवडीला परवानगी देण्यात आली आहे, परंतु ऊस लागवड असो की अन्य खरीप पिकांच्या पेरण्या असो, त्यासाठी जमिनीची पूर्व मशागत होणे आवश्यक आहे. अजून जमिनीत पाणी असल्याने त्या लागणीस योग्य होणे शक्य नाही.
पावसाने उघडीप दिली तरच शेतजमिनींना वाफसा येऊ शकतो. त्यानंतरच ही कामे मार्गी लागू शकतात. अन्यथा यंदा ओल्या दुष्काळाला तोंड द्यावे लागेल अशी स्थिती बारामती तालुक्याच्या बागायती पट्ट्यात निर्माण झाली आहे. ज्या शेतजमिनीत पाण्याचा निचरा होतो, तेथे मात्र पेरणी पूर्व मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे, परंतु अशा जमिनीचे क्षेत्र अत्यंत मर्यादित असेच आहे.