चाकण: कडाचीवाडी (ता. खेड) येथील पाझर तलाव पुन्हा एकदा निष्पाप जिवांचा काळ ठरला आहे. दोन दिवसांपूर्वी या तलावात एकाच वेळी 4 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
ही घटना या तलावात पहिल्यांदाच घडलेली नसून गेल्या 12 ते 15 वर्षांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या तलावाच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे वारंवार होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे. (Latest Pune News)
दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत 4 कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. घरातून सकाळी बाहेर पडलेल्या 13 वर्षांच्या 4 अल्पवयीन मुलांचे मृतदेह या तलावात मिळून आले. ओमकार बाबासाहेब हांगे, श्लोक जगदीश मानकर, प्रसाद शंकर देशमुख आणि नैतिक गोपाळ मोरे (सर्व रा. मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड) अशी या मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे चौघेही बुडाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
यापूर्वीही सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू
नोव्हेंबर 2012 मध्येही याच तलावात खांडेभराड वस्तीतील प्रतीक (वय 15) आणि अभिजित खांडेभराड (वय 12) या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला होता. दिवाळी सुटीमध्ये ते जनावरे चारण्यासाठी गेले असताना पोहायला उतरल्यावर ही घटना घडली होती. पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.
प्रशासनाचे दुर्लक्ष
या तलावात वारंवार अशा घटना घडत असतानाही तलावाभोवती सुरक्षा उपाययोजना, चेतावनी फलक, कुंपण यांसारख्या मूलभूत गोष्टींचा अभाव आहे. त्यामुळे या प्रकारांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हेतुपुरस्सर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तत्काळ खबरदारी घेणे अत्यावश्यक झाले आहे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.