

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांतील खरिपातील पिकांना फटका बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरू केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून, शेतकर्यांना तातडीने मदत देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसून शासन शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.
अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांतील 191 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे 654 पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात 14 लाख 44 हजार 749 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापैकी 10 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले 12 जिल्हे आहेत. यामध्ये 15 ते 20 ऑगस्टदरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. (Latest Pune News)
सर्वाधिक बाधित जिल्हे व नुकसानग्रस्त पिकांखालील क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे. नांदेड - 620566, वाशीम 164557, यवतमाळ 164932, धाराशिव 150753, बुलडाणा 89782, अकोला 43828, सोलापूर 47266, हिंगोली 40 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये बाधित पिके झालेली आहेत. त्यामध्ये सोयाबीन,
मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.
एकूण बाधित जिल्ह्यांमध्ये नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर,सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर यांचा समावेश असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.