पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर पुन्हा एकदा कारवाई केली आहे. पाच घुसखोर बांगलादेशींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पासपोर्ट, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला मिळून आला आहे. भोसरी येथील शांतीनगरमध्ये शनिवारी (दि. 25) सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
शामीम नुरोल राणा (26, रा. जमलपूर, जि. ढाका), राज ऊर्फ सम्राट सधन अधिकारी (27, रा. लक्ष्मीपूर, राजेर, जि. मदारीपूर), जलील नुरू शेख ऊर्फ जलील नुरमोहम्मद गोलदार (38, रा. चर आबूपूर, हिजला, जि. बोरीसाल), वसीम अजिज उलहक मंडल ऊर्फ वसीम अजिज उलहक हिरा (26), आझाद शमशुल शेख ऊर्फ मो. अबुल कलाम शमशुद्दीन फकीर (32, दोघेही रा. फुलबरिया, जि. मयमेनसिंग), अशी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. दरम्यान, आरोपींना पिंपरी येथील नेहरुनगर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत (दि. 29) पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासह त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणार्या इतर संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार सुयोग लांडे यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 26) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात भोसरी येथील शांतीनगरमध्ये काही बांगलादेशी घुसखोर ओळख लपवून वास्तव्य करत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशत विरोधी शाखेला मिळाली. त्यानुसार, दहशतवाद विरोधी शाखा आणि भोसरी पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये पाच संशयितांना अटक केली. त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला व पासपोर्ट मिळून आले. त्यांनी या कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे भासवून भारतात वास्तव्य केले. त्यांनी कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय किंवा भारतामध्ये राहण्यासाठी लागणार्या वैध व्हिसाशिवाय भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकार्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला. भोसरी पोलिस तपास करत आहेत.
हेही वाचा