पुणे : मार्केट यार्डातील हॉटेलला आग; तीन कामगारांचा मृत्यू

पुणे : मार्केट यार्डातील हॉटेलला आग; तीन कामगारांचा मृत्यू
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मार्केट यार्डातील गेट क्रमांक एक जवळील रेवळसिद्ध हॉटेलमध्ये सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत पोटमाळ्यावर झोपलेल्या तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने हॉटेलचे शटर तोडून तिघांनाही बाहेर काढले. या वेळी दोघे मृतावस्थेत, तर एक कामगार जखमी अवस्थेत होता. जखमीचा उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी ससून रुग्णालयात मृत्यू झाला.
शशिकांत सोनबा गडाप्पा (28, रा.सोलापूर), संदीप (पूर्ण नाव माहिती नाही), मुन्ना मोतीलाल राठोड( 37, रा.नांदेड) अशी मृतांची नावे आहेत. अग्निशमन दलाचे जवान शटर तोडेपर्यंत आतून तिघेही कामगार वाचवा-वाचवा असा टाहो फोडत होते. त्यांना वाचविण्यासाठी जवानांनीही शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, दोघांना मृतावस्थेत, तर एकाला गंभीर जखमी पाहून जवानही हळहळले.

जिवाच्या आकांताने टाहो

मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी सांगितले, की हॉटेल मालकाने मजूर अड्ड्यावरून दोन दिवसांपूर्वीच मुन्ना आणि संदीपला कामासाठी आणले होते. शशिकांत, संदीप आणि मुन्ना तिघेही हॉटेल बंद झाल्यावर साफसफाई करून पोटमाळ्यावर झोपत होते. कालही (सोमवारी) हॉटेल बंद झाल्यावर शटरला आतून कुलूप लावून तिघे पोटमाळ्यावर झोपले होते. त्यांना रात्री एकच्या सुमारास भटारखान्यातून धूर येताना दिसला. धूर वाढल्यानंतर अचानक आगीचे लोट सुरू झाले. तिघांनीही पोटमाळ्यावरून खाली उतरत शटरकडे धाव घेतली. मात्र, शटर आगीने इतके गरम झाले होते की त्यांना कुलूप उघडता आले नाही.

त्यातील एका कामगाराने हॉटेल मालकाला फोन करून बोलावून घेतले. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका सुरक्षा रक्षकाला हॉटेलमधून धूर येत असल्याचे दिसल्याने त्याने पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी हॉटेलजवळ येऊन शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीमुळे त्यांनादेखील ते जमले नाही. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला कॉल दिला. तोपर्यंत हॉटेलमालकही हॉटेलच्या बाहेर पोहोचला होता. आतून कामगार जिवाच्या आकांताने वाचवा वाचवा असा टाहो फोडत होते. दरम्यान, अग्निशमन दलाचे बंब दाखल होईपर्यंत आतून कामगारांचा प्रतिसाद थांबलेला होता.

जवानांनी शटर तोडल्यावर शशिकांत आणि संदीप जागेवरच मृत आढळले. तर, मुन्नाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघेही जवळपास 80 टक्के भाजले होते. भाजल्याने तसेच गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले, की आम्ही हॉटेलमध्ये तपासणी केली असता चार सिलिंडरपैकी तीन सिलिंडर लिक होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे प्राथमिक अंदाज बघता सिलिंडर लिक झाल्याने त्याचा मोठा भडका होऊन कामगार भाजले गेले असावेत. अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथ—ुडकर, प्रदीप खेडेकर, सुनील नाईकनवरे, तसेच तांडेल मनीष बोंबले, मंगेश मिळवणे, फायरमन दिगंबर बांदिवडेकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख यांनी कामगारांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
हॉटेलमध्ये काम करणारे कामगार अनेकदा रात्री तेथेच झोपतात. त्यामुळे आगीचा प्रसंग घडला, तर त्यांना आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. 2016 मध्ये कोंढव्यातील एका बेकरीला लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे कामगरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news