शेअर बाजारावर तेजीचा मोठा प्रभाव, निर्देशांक उसळले | पुढारी

शेअर बाजारावर तेजीचा मोठा प्रभाव, निर्देशांक उसळले

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मंगळवारच्या सलग दुसर्‍या सत्रामध्ये भारतीय शेअर बाजारांवर तेजीचा जबरदस्त प्रभाव राहिला. या क्षेत्रात स्थावर मिळकत कंपन्या, प्रसार माध्यम क्षेत्रातील कंपन्या व फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुडस् या क्षेत्रातील कंपन्यांना जोरदार खरेदीचा पाठिंबा लाभल्याने त्यांच्यात उत्तम भाववाढ झाली. परिणामतः सत्राच्या अखेरीस मुंबई शेअर निर्देशांकात 418 वर्षांची तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी मध्ये 115 अंशांची उत्तम भर पडलेली होती. सत्रामध्ये रिलायन्ससह आयटीसी व आयसीआयसीआय बँक यांच्यात मोठी भाववाढ झाली.

या सत्रात मुंबई शेअर निर्देशांक 62 हजार 779.14 अंश पातळीवर खुला झाला. त्याने दिवसभरात 63 हजार 177.47 ही उच्चांकी पातळी गाठली, तर 62 हजार 777.04 ही नीचांकी नोंदवली. कालच्या सत्राच्या तुलनेत त्यात 418.45 अंशांची चांगली वाढ होऊन तो दिवसअखेरीस 63 हजार 143.16 पातळीवर बंद झालेला होता. निफ्टी या सत्रात 18 हजार 631.80वर खुला झाला. त्याने दिवसभरात 18 हजार 728.90 उच्चांकी तर 18 हजार 631.80 ही नीचांकी पातळी नोंदवली. या सत्रात त्यात 114.65 अंशांची वाढ होऊन तो अखेरीस 18 हजार 716.15 अंश पातळीवर बंद झाला.

एमआरएफच्या एका शेअरचा भाव एक लाख

प्रतिशेअर एक लाख रुपये या भावपातळीला स्पर्श करणारा एमआरएफ हा पहिला भारतीय शेअर ठरला. मंगळवारी शेअर बाजार सुरू झाला असता या शेअरचा भाव 99,500 रुपये होता. सकाळच्या काळातच त्याने 1,00,300 रुपये या सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केला. गेल्या वर्षभरात या समभागात जोरदार वाढ झाली आहे. बेंचमार्क सेन्सेक्समधील 19 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत एमआरएफ गेल्या एका वर्षात 45 टक्क्यांनी वाढला आहे. एमआरएफच्या शेअर्सनी 17 जून 2022 रोजी बीएसईवर 65,900.05 ही 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली होती. गेल्या मार्चअखेरच्या तिमाहीत एमआरएफचा ताळेबंद मजबूत असल्याचे दिसून आले होते.

Back to top button