

पुणे: मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा खराडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, पाच पीडित महिलांची सुटका केली. यामध्ये नागालँड, पश्चिम बंगाल, राजस्थानमधील महिलांचा समावेश आहे. खराडीतील ग्लोबल बिझनेस हबमधील ‘सेलेस्टिया द वेलनेस स्पा’ येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात स्पा मालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन असलेल्या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आहे. ‘स्पा’ मालक कफीलउद्दीन (वय 30, रा. जमुनामुख, आसाम) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, तो फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. याबाबत महिला पोलिस अंमलदार वैशाली खेडेकर यांनी फिर्याद दिली आहे.(Latest Pune News)
सेलेस्टिया ‘द वेलनेस स्पा’ येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती खराडी पोलिसांना मिळाली होती. बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता येथे ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समजले.
त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने येथे छापा टाकला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. येथून पोलिसांनी पाच पीडित महिलांची सुटका केली. तर, अल्पवयीन असलेल्या मॅनेजरला ताब्यात घेतले. मॅनेजरसह त्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खराडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोनाली भदे, पोलिस अंमलदार नवनाथ वाळके, सुरेंद्र साबळे, अमोल भिसे, महेश नाणेकर, वैशाली खेडेकर, पूजा डाहाळे, कोमल वाकचौरे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.