

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवानिमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. भगवान विष्णूंना समर्पित असे हिंदू मंदिर म्हणजे तिरुअनंतपुरम (केरळ) येथील पद्मनाभ स्वामी मंदिर.
हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानल्या जाणार्या 108 दिव्य देसमांपैकी अर्थात निवासस्थानांपैकी एक असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी शनिवारी (दि. 31) दिली. (Latest Pune News)
सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीची सुरुवात कलादिग्दर्शक विनायक रासकर आणि सरिता रासकर यांच्या हस्ते झाली. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र ऊर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते.
श्री पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ शैली आणि द्रविड शैलीच्या वास्तुकलेचे मिश्रण करून बांधले गेले आहे. मंदिराच्या प्रतिकृतीत 5 थरांचा गोपुर असणार आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येतील.
तर, गाभार्यात भगवान विष्णू, लक्ष्मी, शिव-पार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती असतील. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात येणार आहे. मंदिराची प्रतिकृती सुमारे 100 फूट इतकी असेल.