

Pune civic elections
पुणे: आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच महापालिकेत राजकीय नेत्यांची आयुक्तांच्या भेटीसाठी लगबग वाढली आहे. सत्ताधारी भाजपचे नेते आणि पदाधिकारी आघाडीवर असून, विकासकामांच्या आढाव्याच्या निमित्ताने बैठका होत असल्याने प्रभागरचनेवरून विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
प्रभागरचनेचा आराखडा तयार करण्याबाबत राज्य शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार येत्या सोमवार (दि. 4 ऑगस्ट) पर्यंत महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा शासनाला सादर केला जाणार आहे. (Latest Pune News)
त्यामुळे प्रशासनाकडून आता प्रारूप प्रभागरचनेच्या आराखड्यावर अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे, हे लक्षात घेऊन प्रभागरचना आपल्या पक्षाला आणि इच्छुक कार्यकर्त्यांना अनुकूल व्हावी, यासाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांकडून आयुक्तांच्या भेटी-गाठीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
गुरुवारी दुपारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे यांनी आयुक्तांची भेट घेत चर्चा केली. शहरातील प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात आले. तब्बल अडीच ते तीन तास ही चर्चा सुरू होती. विशेष बाब म्हणजे भाजपकडून महापालिका निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी दिलेले माजी सभागृह नेते गणेश बीडकर उपस्थित होते. बैठकीनंतरही त्यांनी आयुक्तांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही दोन दिवसांपूर्वी आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी प्रभाग रचना करताना सत्ताधार्यांच्या दबावाला बळी न पडता निरपेक्षपणे करावी, अशी मागणी त्यांनी केल्याचे सांगण्यात आले. या सोबतच काही माजी नगरसेवकांनी आयुक्तांच्या गाठीभेटी घेतल्याचे समजते.
शिवसेना शहरप्रमुख भानगिरेंना भेट नाही
शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे हेसुद्धा गुरुवारी दुपारी महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी महापालिकेत आले होते. मात्र, त्यांना आयुक्तांची मंत्री पाटील यांच्याशी उशिरापर्यंत चाललेली बैठक आणि त्यानंतर अन्य बैठका यामुळे भानगिरे यांना आयुक्तांची भेट मिळाली नाही.