

Dr. Khewalkar objectionable videos photos
पुणे: खराडीतील हॉटेलमध्ये झालेल्या ड्रग पार्टीतील आरोपी डॉ. प्रांजल खेवलकर याच्या मोबाइलमध्ये वेगवेगळ्या महिलांसोबत पार्टीमध्ये व पार्टीनंतर केलेल्या गैरकृत्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो आढळून आले आहेत.
डॉ. खेवलकर वेगवेगळ्या मित्र व मैत्रिणींसह गेल्या दीड वर्षात 43 दिवस या हॉटेलमध्ये राहिला आहे. अटक आरोपीपैकी एकाने डॉ. खेवलकरला सिगारेटचा फोटो पाठवून, माल पाहिजे का? असे विचारले असता त्यानेहोकारार्थी उत्तर दिले. त्या माध्यमातून पार्टीत ड्रग आणले गेल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती गुरुवारी (दि. 31) पोलिसांनी न्यायालयाला दिली. (Latest Pune News)
डॉ. प्रांजल खेवलकर (वय 41, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी (वय 35, रा. डीएसके सुंदरबन, माळवाडी), समीर फकीर महंमद सय्यद (वय 41, ऑर्किड सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा), सचिन सोनाजी भोंबे (वय 42, डायमंड पार्क सोसायटी, वाघोली) आणि श्रीपाद मोहन यादव (वय 27, रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने पाच आरोपींना गुरुवारी दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील अनिल कुंभार म्हणाले की, पार्टीत ड्रग कशा पद्धतीने आणण्यात आले, हे अटक केलेला एक आरोपी आणि डॉ. खेवलकर यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या संभाषणाद्वारे स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर त्या आरोपीने दुसर्यांदा ‘तो माल आणायचा आहे का?’ असे विचारले असता, त्यावर डॉ. खेवरलकरने होकारार्थी उत्तर देवून ‘ठेवून घे’ असे म्हटल्याचा संवाद मिळाला आहे. आरोपीने माल पाहिजे आहे का? असे विचारून वेगवेगळ्या मुलींचे फोटो पाठविल्याचे सायबर तज्ज्ञांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. पार्टीच्या ठिकाणाहून प्लास्टिकच्या पिशवीमधून अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
कारवाईत मिळालेल्या तीन पुड्या एकत्र केल्या आहेत, अशी माहिती कुंभार यांनी न्यायालयाला दिली. या वेळी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात दोन महिलांनाही यापूर्वी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या सर्वांचा मुक्काम आता येरवडा कारागृहात असणार आहे.
वजनानुसार अमली पदार्थविरोधी कायदा लागू होत नाही
मोबाइलमध्ये काय आहे, यापेक्षा गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यात काय मिळाले, याची माहिती पोलिसांनी द्यावी. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या तपासासाठी आरोपींची आवश्यकता नाही. मोबाइलमधील डेटाचा मुद्दा मांडून तपास भरकटविण्यात येत आहे.
जप्त अमली पदार्थांचा अहवाल अद्याप आला नसून फोटो व व्हिडीओचा मुद्दा उपस्थित करून आरोपींना अडकविण्यात येत आहे. मोबाइलमधील डेटाचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. जप्त केलेल्या पदार्थांचे वजन विचारात घेतले असता या गुन्ह्यात अमली पदार्थविरोधी कायदा लागू होत नाही. पोलिसांनी नमूद केलेल्या मालाची व्याख्या या कायद्यात नाही, असा युक्तिवाद बचावपक्षाकडून करण्यात आला.
आरोपी दोन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात
डॉ. खेवलकरने एका महिला आरोपीसमवेत वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पार्ट्या केल्या आहेत. पार्टीत अमली पदार्थ तयार करणार्याचे नाव निष्पन्न झाले आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. पाहिजे असलेल्या आरोपीबाबत चौकशी केली असता आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, अशी माहिती तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी
न्यायालयास दिली. दरम्यान, आरोपी हे दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचे सायबर तज्ज्ञांचे अहवाल आणि साक्षीदारांच्या तपासातून निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले.
आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी
हुक्का तयार करणार्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित करायचा आहे. आरोपींच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून मोठ्या प्रमाणात डेटा मिळाला असून, त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. डॉ. खेवलकरचा दुसरा मोबाइल, कॅमेरा, लॅपटॉप आणि घटनास्थळावरून मिळालेले डीव्हीआर तसेच इतर सहा आरोपींचे जप्त मोबाइल व पेन ड्राइव्ह यांचा सायबर तज्ज्ञांकडून सविस्तर स्पष्ट अहवाल पुढील दोन दिवसांत प्राप्त होणार आहे.
त्या अहवालावरून आरोपींकडे चौकशी करायची आहे. या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत तीन दिवस वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील योगेश कदम यांनी केला. आरोपींच्या वतीने अॅड. हृषीकेश गानू, अॅड. विजयसिंग ठोंबरे, अॅड. पुष्कर दुर्गे, अॅड. सचिन झालटे-पाटील, अॅड. सागर कवडे, अॅड. अजिंक्य मिरगळ यांनी बाजू मांडली.