

Sugar price hike due to quota shortage
पुणे: केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी 22 लाख 50 हजार टनाइतका साखरेचा कोटा विक्रीसाठी खुला केला आहे. गतवर्षापेक्षा कोट्यामध्ये सुमारे अडीच लाख मेट्रिक टनांनी कपात केली आहे. ऐन सणासुदीसाठी घोषित केलेला कोटा अपुरा असल्यामुळे गुरुवारी घाऊक बाजारात साखरेचे दर क्विंटलमागे शंभर रुपयांनी कडाडून प्रति क्विंटलला 4200 ते 4250 रुपयांवर पोहोचले. मागणी वाढत राहिल्यास त्यामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यापार्यांनी वर्तविला.
राज्यात संपलेल्या ऊस गाळप हंगामअखेर म्हणजे 2024-25 अखेर 260 लाख ते 262 लाख मेट्रिक टनाइतकेच साखरेचे उत्पादन हाती येण्याची दाट शक्यता आहे. उत्पादन कमी येण्यामुळे केंद्र सरकारकडून अलीकडे घोषित करण्यात येणारे साखरेचे कोटे कमी देण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. (Latest Pune News)
साखर कारखान्यांवर प्रति क्विंटलला 3750 रुपयांपर्यंत जाणार्या साखर निविदा क्विंटलला आता 3850 रुपयांपर्यंत जात आहेत. निविदांची स्थिती कशी राहणार यावरून साखर दरातील तेजीचे चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
श्रावण महिना सुरू असून, आगामी राखीपौर्णिमा, 15 ऑगस्ट, गोकुळअष्टमी आणि ऑगस्ट महिनाअखेर गौरी-गणपतीचा सण आहे. म्हणजेच सणासुदीच्या दिवसात साखरेच्या खपात वाढ होत असते. साखरेचे दर आणखी वधारण्याची शक्यता घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात आली.