पिंपरी : ‘ई-ऑफिस’मुळे फाईलींचा निपटारा होणार लवकर

पिंपरी : ‘ई-ऑफिस’मुळे फाईलींचा निपटारा होणार लवकर
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी(पुणे) : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात ई ऑफिस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. नागरिकांची तसेच प्रशासकीय कामे जलद गतीने व्हावी, पेंडन्सी राहू नये, यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला. पोलिस ठाण्याच्या नावाने आलेले टपाल पोलिस आयुक्त कार्यालयात येते.

तेथून संबंधित पोलिस ठाण्यांचे कर्मचारी स्वतः येऊन टपाल घेऊन जात होते. मात्र, आता नव्या प्रणालीनुसार हे टपाल संबंधित पोलिस ठाण्यांना ऑनलाईन माध्यमातून पाठवले जाणार आहे. तसेच, नागरिकांचे तक्रार अर्ज आणि इतर कागदपत्रेदेखील ऑनलाइन माध्यमातून पोलिस ठाण्यांसह इतर विभागांना पाठवली जाणार आहे. ज्यामुळे वेळ वाचणार आहेत. एकंदरीतच ई- ऑफिस प्रणालीमुळे आयुक्तालयातील फाईलींचा वेग वाढणार आहे.

कायमस्वरूपी रेकॉर्ड मिळणार

यापूर्वी हातोहात फाईलींची देवाणघेवाण होत असल्याने कागदपत्रे गहाळ होण्याची शक्यता होती. एखादा महत्त्वाचा कागद गहाळ झाला तरीही पुन्हा मोठी प्रक्रिया पार पाडावी लागत होती. मात्र, आता प्रत्येक कागद स्कॅन करून पाठवला जात असल्याने प्रत्येक कागदाचे रेकॉर्ड राहणार आहे. भविष्यात कधीही गरज पडल्यास एका क्लिकवर फाईल पाहता येणार आहे.

सॉफ्टसह हार्ड कॉपीही पोहोचणार

ई- ऑफिस प्रणाली सुरू करून अवघे काही दिवसच झाले आहेत. यासाठी एक अधिकारी आणि दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, संबंधित पोलिसांच्या अंगवळणी पडेपर्यंत काही दिवस सॉफ्ट कॉपीसह हार्ड कॉपीदेखील पाठवल्या जाणार आहेत. एकदा सर्वांना याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर हार्ड कॉपी पाठवणे बंद करण्यात येणार आहे.

पोलिस महासंचालकांच्या हस्ते होणार उद्घाटन

ई- ऑफिस ही संकल्पना सर्वप्रथम रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात सुरू करण्यात आली. त्यानंतर मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयातही ई- ऑफिस प्रणालीचा अवलंब केला. त्यानंतर ई- ऑफिस सुरू करणारे पिंपरी- चिंचवड पोलिस राज्यात तिसर्‍या क्रमांकावर आहेत. पिंपरी- चिंचवडमध्ये प्रायोगिक तत्वावर ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. ई- ऑफिस वापरताना येणार्‍या त्रुटी सोडवण्याचे काम सुरू आहे. सर्व त्रुटींचे निराकरण झाल्यानंतर राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे.

नागरिकांना मिळणार जलद प्रतिसाद

नागरिक तक्रारी अर्जाच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडतात. पोलिस आयुक्त कार्यालयाकडून नागरिकांच्या अर्जाची दखल घेऊन संबंधित पोलिस स्टेशन अथवा वरिष्ठ अधिकार्‍यांकडे अर्ज पाठवले जातात. मात्र, नागरिकांचे अर्ज पोलिस आयुक्त कार्यालयातून संबंधित अधिकार्‍यांपर्यंत जाण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे नागरिकांच्या अर्जांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी ई- ऑफिस प्रणालीचा फायदा होणार आहे. ज्यामुळे नागरिकांना जलद प्रतिसाद मिळणार आहे.

कामे रखडणार नाहीत

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना विविध न्याय प्रक्रियेच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरात जावे लागते. तसेच, बैठका, बंदोबस्त, इतर कार्यक्रमांनादेखील बाहेर राहावे लागते. ज्यामुळे अधिकार्‍यांच्या सहीसाठी ठेवलेली फाईल दिवसेंदिवस टेबलवर पडून राहते. मात्र, ई- ऑफिस या प्रणालीमुळे अधिकार्‍यांना कोठूनही संकेतस्थळावर लॉगिन करून काम करता येणार आहे. त्यामुळे आयुक्तालयातील कामे रखडणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.

कामाचे मूल्यांकन होणार सोपे

पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनायककुमार चौबे आयआयटी कानपूर या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. शैक्षणिक पार्श्वभूमी तंत्रज्ञानावर आधारित असल्याने त्यांचा तांत्रिक बाबींवर भर असतो. पोलिसांचा कारभार हा टेक्नोसेव्ही करण्याकडे चौबे यांचा ओढा आहे. यातूनच त्यांनी ई- ऑफिस संकल्पना सुरू केली आहे. त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळदेखील बनविण्यात आले आहे. त्याचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड संबंधित सर्व अधिकार्‍यांना उपलब्ध करून दिले आहेत. संकेतस्थळावर लॉगिन केल्यास फाईल कोणाकडे पेंडिंग आहे. कोणी किती जलद काम केले, याबाबत वरिष्ठांना माहिती मिळणार आहे. एकंदरीत ई- ऑफिस प्रणालीमुळे अधिकार्‍यांचे मूल्यांकन करणे सोपे जाणार आहे.

नागरिकांची तसेच खात्यांतर्गत सुरू असलेली प्रशासकीय कामे जलद गतीने व्हावी, यासाठी ई- ऑफिस सुरू करण्यात आले आहे. ज्यामुळे कामाची पेन्डंसी राहणार नाही. तसेच, एका क्लिकवर फाईलची सद्यस्थिती पाहता येणार आहे. याचा नागरिकांना नक्कीच फायदा होईल.

– विनयकुमार चौबे,
पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news