Dattatray Bharne agriculture minister
वालचंदनगर: इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी या छोट्याशा गावातील शेतकरीपुत्र असलेले दत्तात्रय भरणे यांच्यावर राज्याच्या कृषिमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. दत्तात्रय भरणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भरणे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. भरणे हे आजही गावाकडे असताना दरदिवशी आपल्या शेतात फेरफटका मारूनच आपल्या दैनंदिन कामकाजास सुरुवात करतात. भरणे यांच्या रूपाने तब्बल 50 वर्षांच्या खंडानंतर पुणे जिल्ह्याला राज्याचे कृषिमंत्रीपद मिळाले आहे. (Latest Pune News)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर कृषिमंत्रिपदी नियुक्ती झालेले दत्तात्रेय भरणे हे पुणे जिल्ह्यातील दुसरे नेते ठरले आहेत. पुणे जिल्ह्यातील तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार यांची 21 फेब्रुवारी 1975 रोजी राज्य मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून निवड झाली होती. त्या वेळी पवार यांना दोन वर्षे एक महिना 25 दिवसांचा कार्यकाळ मिळाला होता.
याशिवाय जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवून कृषिमंत्री झालेले दत्तात्रय भरणे हे राज्यातील चौथे नेते ठरले आहेत. नाशिक जिल्ह्यातील दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे, पुणे जिल्ह्यातील दत्तात्रेय भरणे आणि बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे या चार नेत्यांचा यात समावेश आहे. भुसे व कोकाटे हे दोन्ही नेते नाशिक जिल्हा परिषदेचे, भरणे हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. तर माजी मंत्री मुंडे हे बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत.
शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेऊ....
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून आपण चांगले काम करणार आहे. राज्यातील शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
माझे चुलते आणि वडील पाहिजे होते
कृषिमंत्रिपदी निवड झाल्यानंतर दत्तात्रय भरणे म्हणाले, “मी स्वतः शेतकरी असल्याने मला शेतकर्यांच्या व्यथा माहीत आहेत. त्यामुळे या खात्याचे मंत्रिपद मिळाल्याचा नक्कीच आनंद वाटत आहे. मात्र, हा क्षण पाहण्यासाठी माझे चुलते दिवंगत भगवानराव भरणे व माझे वडील दिवंगत विठोबा भरणे पाहिजे होते.” या वेळी दत्तात्रय भरणे भावुक झाले होते.