

पुणे : शहरातील सर्व खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी अग्निशमन विभागाला दिले. ज्या रुग्णालयांच्या फायर ऑडिटमध्ये त्रुटी निघतील, त्यांचा परवाना थेट रद्द केला जाईल, असा इशारा राम यांनी दिला आहे.
आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राम यांनी महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतला. अग्निशमन विभागाचा आढावा घेताना त्यांनी रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले का? अशी विचारणा केली. त्यावर अग्निशमन विभागप्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे ऑडिट झाल्याचे सांगितले. त्यावर राम यांनी शहरातील 15 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या रुग्णालयांच्या फायर ऑडिटची तपासणी करा. ज्या रुग्णालयांनी अद्याप ऑडिट केलेले नाही अथवा त्यांच्या फायर सिस्टिममध्ये त्रुटी आहेत अशा रुग्णालयांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केले.
शहरातील अनधिकृत होर्डिंग्जबाबत काही तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सर्व होर्डिंग्जचे पुन्हा सर्वेक्षण केले जाईल. धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली जाईल, असे आयुक्त राम यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यात धोकादायक झालेल्या भिंती कोसळतात, काही वर्षांपूर्वी शहरात दोन ठिकाणी भिंती कोसळून वीसपेक्षा अधिक कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शहरातील धोकादायक भिंतींची माहिती घेणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.