देशाचे तुकडे पडण्याची भीती : पन्नालाल सुराणा

देशाचे तुकडे पडण्याची भीती : पन्नालाल सुराणा
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशाची परिस्थिती बिघडत चालली आहे, आपला रोख सांप्रदायिकतेकडे चालला आहे. मोदी सरकारच्या भांडवली धोरणांमुळे विषमता, बेरोजगारी आणि धार्मिक तेढ वाढत असून, देशाचे तुकडे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याविरोधात येत्या निवडणुकीत सर्व समाजवाद्यांनी दंड थोपटून उभे राहिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजवादी पन्नालाल सुराणा यांनी व्यक्त केले.
संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस व आमदार कपिल पाटील यांच्या पुढाकारातून एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात समाजवादी जनता परिवाराच्या एकजुटीच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासह प्रा. सुभाष वारे, नितीन वैद्य, अभिजित वैद्य, शशांक राव, शान-ए-हिंद, शब्बीर अन्सारी आदी विविध राजकीय पक्ष व कष्टकरी, कामगार व विद्यार्थी संघटनांचे राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते. सप्तर्षी म्हणाले, ' मोदी सरकारच्या काळात लोकशाही समाजवादावर संकट निर्माण झाले असून, त्याविरोधात ठिकठिकाणी अशा बैठकांचे आयोजन करण्याची गरज आहे.' समाजवादी कार्यकर्ते एकत्र आल्यास स्थित्यंतर घडते, त्याची सुरुवात या बैठकीने झाल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आणीबाणीपासून वाचविण्यासाठी जनता दल निर्माण झाले, आता लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्याची गरज आहे. शेतकरी, कष्टकर्‍यांचे प्रश्न गंभीर होत असून, सरकारच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. समाजवाद्यांनी जनतेशी संवाद साधून इंडिया आघाडीच्या मागे ताकद उभी करावी, असे डॉ. आढाव यांनी सांगितले.

बैठकीत मांडण्यात आलेलेे ठराव
अल्पसंख्याकांना सन्मानाने जगता येईल, असे वातावरण सरकारने तयार करावे. माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार सुधारणा विधेयक सरकारने मागे घ्यावे, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ओबीसींसह सर्व जातींची जनगणना करावी, अवर्षणामुळे शेती अडचणीत आली असून, सरकारने श्वेतपत्रिका काढावी, महामानवांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही आदी ठराव या वेळी करण्यात आले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news