मुंबई येथे पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच; पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

मुंबई येथे पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच; पाण्यासाठी शेतकरी आक्रमक

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथील शेतकर्‍यांना कळमोडी धरणाचे पाणी मिळावे, यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे गेले पाच दिवस शेतकरी उपोषण करत आहेत. मात्र, सरकार दखल घेत नसल्याने शेतकर्‍यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी सोमवार (दि. 26) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

याबाबत माहिती देताना देविदास दरेकर म्हणाले की, खेड तालुक्यात कळमोडी धरण बांधून 12 वर्षे पूर्ण झाली. मात्र आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भाग व खेड तालुक्यातील अनेक गावे अद्याप पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पाण्याविना ह्या भागाचा विकास रखडलेला आहे. वर्षातील सहा महिने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतो.

याशिवाय डिंभे धरणातील हुतात्मा बाबू गेनू सागरातून पाणी थेट बोगद्याद्वारे नगर जिल्ह्यात नेण्याचा घाट घातला गेल्याने डिंभे धरण परिसरातील आदिवासी गावे व घोड नदीवर अवलंबून असणारी आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील अनेक गावे भविष्यात पाण्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकरी बांधव पाच दिवसांपासून उपोषण आंदोलन करत आहेत.

शुक्रवारी (दि. 30) उपोषणाच्या पाचव्या दिवशी भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक आणि उद्योजक महेश ढमढेरे, आंबेगाव तालुका मुंबई रहिवासी संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब भापकर, राजू सैद, बाळासाहेब पवार यांनी उपोषणस्थळी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख प्रवीण थोरात पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवींंद्र तोत्रे, उपसरपंच तुषार थोरात, आप्पा तोडकर, सूर्यकांत ढमाले, माजी उपसरपंच पोपट थोरात, राहुल थोरात, किरण थोरात, पवा थोरात, निकेश थोरात, राकेश मावकर यांच्यासह संख्येने शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

हजारो शेतकर्‍यांच्या जमिनीवर भूसंपादनाचे शिक्के पडलेले आहेत. त्यामुळे त्यांना कोणतीही बँक कर्ज देत नाही. वारस नोंदी रखडल्याने घराघरांत भाऊबंदकीचे वाद सुरू आहेत. सरकारने शेतकर्‍यांच्या मागणीची त्वरित दखल घेणे गरजेचे आहे.

– रामशेठ तोडकर, संचालक, भैरवनाथ पतसंस्था लांडेवाडी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news